नाशिक | प्रतिनिधी | Nashik
एका तरुणाने भरधाव वेगात स्कॉर्पिओ (Scorpio) चालवून रस्त्याने जाणाऱ्या तिघांना चिरडल्याची घटना सातपूर (Satpur) येथील स्कॉडा शोरूमजवळ शुक्रवारी रात्री घडली. या घटनेत काही वाहनांसह टपरीचे नुकसान झाले असून चालकासह स्कॉर्पिओतील चौघे टवाळखोर रॅश ड्रायव्हिंग करून पळून गेले. मात्र, पोलिसांनी (Police) तुटलेल्या नंबरप्लेटसह सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चालकासह कार ताब्यात घेतली आहे. याबाबत गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन राजेंद्र पाटील (३२) व त्यांची आई विमलाबाई राजेंद्र पाटील (५५, रा. धनश्री हाईटस्, भवर टॉवरजवळ, सातपूर) व स्वप्निलकुमार रवींद्र पाटील (२५, रा. ध्रुवनगर, गंगापूररोड) अशी अपघातात गंभीर झालेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत. शुक्रवारी रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास सातपूर रोडवरील स्कॉडा वाहनाच्या शोरूमजवळून पाटील हे आईसह जात होते. तसेच स्वप्निकुमार हादेखील रस्त्याने जात होता. तेव्हा स्कॉर्पिओ कार (एमएच १५ बीएक्स ५५०८) वरील संशयित चालकाने अशोकनगरकडून भरधाव वेगात चालवून आणली.
चालक व कारमधील तरुणाई (Youth) जोशात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याने जाणाऱ्या चार ते पाच दुचाकींना धडक दिली. तसेच रस्त्यावरील एका टपरीला ठोस मारून नुकसान केले. त्यानंतर चालकाने कारसह पळ काढला. या घटनेची माहिती कळताच सातपूर पोलीस ठाण्याचे (Satpur Police Station) वरिष्ठ निरीक्षक रणजित नलावडे यांच्यासह अधिकारी आणि अंमलदार दाखल झाले. त्यांनी इतर नागरिकांच्या मदतीने तिघाही जखमींना रुग्णालयात दाखल केले.
चौघे नशेत
प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, चालक व त्याचे तीन साथीदार मद्याच्या नशेत होते. त्यांनी सातपूर रोडवरून रॅश ड्रायव्हिंग करून वाहनांना चिरडले. त्यामुळे अशा तरुणाईवर कायद्यान्वये अंकुश आणावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, संशयितांचा ताबा घेऊन त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. मद्य प्राशन केल्याचे अहवालात नमूद असल्यास त्यांच्यावर ड्रंक अॅण्ड ड्राईव्हनुसार वाढीव कलमान्वये कारवाई केली जाणार आहे.
मुद्दे
- जखमींवर शर्थीचे उपचार सुरू
- चार वाहनांसह टपरीचे अतोनात नुकसान
- घटनेमुळे परिसरात काहीकाळ भीतीचे वातावरण
- संशयितावर मोटार वाहन अधिनियम सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न आणि मालमत्तेचे नुकसान केल्याचे गुन्हे




