Tuesday, January 6, 2026
Homeक्राईमNashik News : पोलिसांच्या सतरा सेवा 'ऑनलाईन'; 'आपले सरकार' पोर्टलवर सुविधा

Nashik News : पोलिसांच्या सतरा सेवा ‘ऑनलाईन’; ‘आपले सरकार’ पोर्टलवर सुविधा

फेऱ्या मारण्याची गरज टळणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळबद्ध सेवा मिळाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर पोलिसांच्या गृह विभागास प्राधान्य देण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून पोलीस विभागाच्या (Police Department) एकूण १७ महत्त्वाच्या सेवा आता पूर्णतः ऑनलाईन (Online) देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अर्जदारांना पोलीस ठाणे अथवा पोलीस आयुक्तालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज उरलेली नाही.

- Advertisement -

ऑनलाईन प्रणालीमुळे नागरिक घरबसल्या किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमधून अर्ज सादर करता येतील. अर्जाची सद्यस्थिती, सेवा मंजूर किंवा नामंजूर झाल्याची माहिती अर्जदारांना ऑनलाईनच मिळते. सेवा हक्क कायद्यानुसार ठरवून दिलेल्या कालावधीत सेवा देणे संबंधित विभागावर बंधनकारक असल्याने नागरिकांचा वेळ व खर्च दोन्ही वाचणार आहेत. या संदर्भात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नागरिकांना डिजीटल सुविधांचा (Digital Service) अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले आहे.

YouTube video player

पोर्टलवर नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यास संबंधित सेवा जलद व सुलभ पद्धतीने मिळतील. त्यामुळे पोलीस ठाण्यांतील गर्दी व ताण कमी होण्यास मदत होणार आहे. पोलीस विभागाच्या विविध परवानग्या, प्रमाणपत्रे व ना-हरकत दाखले आता ऑनलाईन उपलब्ध झाल्याने नागरिकांना (Citizen) मोठा दिलासा आहे. विशेषतः परदेश प्रवास, शस्त्र परवाना, कार्यक्रम परवानगी, चित्रपटगृह व मनोरंजनाशी संबंधित सेवा या आता एका क्लिकवर मिळणार आहेत.

प्रमुख सेवा

  • विदेशी कलाकारांच्या सहभागास परवानगी
  • ध्वनीक्षेपक (लाऊडस्पीकर) परवाना
  • सभा, संमेलन, मिरवणूक, शोभायात्रा परवानगी
  • पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, हॉटेल, बारसाठी ना-हरकत प्रमाणपत्र
  • पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र
  • सिनेमागृह परवाना व नुतनीकरण
  • चित्रपट किंवा मालिका चित्रीकरणासाठी जागेचा परवाना
  • मनोरंजन कार्यक्रमांना ना-हरकत प्रमाणपत्र
  • शस्त्र परवान्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र
  • परदेश प्रवासासाठी पोलिस अनुमती प्रमाणपत्र (शिक्षण, नोकरी)
  • एफआयआरची प्रत ऑनलाईन उपलब्ध
  • तमाशा, मेळा व सार्वजनिक मनोरंजन कार्यक्रमांना परवाना व नियंत्रण.
एबी फॉर्म नाकारल्याने इच्छुक उमेदवाराने घेतले तोंड झोडून; आमदार सीमा हिरे, भाजपविरोधात घोषणाबाजी |

ताज्या बातम्या