सटाणा | प्रतिनिधी | Satana
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत (Satana APMC Elections) प्रस्थापितांना हादरा देत सोसायटी व ग्रामपंचायत गटात श्री यशवंत शेतकरी विकास पॅनलने (Shri Yashwant Shetkari Vikas Panel) ९ जागांवर विजय प्राप्त केला असून, प्रतिस्पर्धी शेतकरी विकास पॅनलला ६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. संचालक मंडळाच्या १८ पैकी उपरोक्त १५ जागा व इतर व्यापारी तसेच हमाल व तोलारी गटातील ३ जागांचा निकाल जाहीर झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बागलाणचे सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांनी कामकाज केले.
विजयी उमेदवारांमध्ये (Winning Candidates) गॅस सिलेंडर या निशाणीवर निवडणूक (Election) लढविणाऱ्या बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत सोनवणे, भाजपचे माजी शहराध्यक्ष राहुल सोनवणे, गजेंद्र चव्हाण आदींच्या नेतृत्वाखालील श्री यशवंत पॅनलचे सहकारी संस्थांचा मतदारसंघ सर्वसाधारण गटात रवींद्र विठ्ठल सोनवणे, राहुल केदा सोनवणे, दिनेश अशोक गुंजाळ, मनोहर दयाराम बिरारी, महिला राखीव गटात सिंधुबाई संजय सोनवणे, इतर मागासवर्गीय गटात काळू दौलत जाधव, विमुक्त जाती व भटक्या जमाती गटात निंबा पुंजाराम वानले, ग्रामपंचायत मतदारसंघातील अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गात गणेश वामन ठाकरे, आर्थिक दुर्बल घटकमधून दीपक मधुकर रौंदळ विजयी झाले आहेत.
तसेच मविप्रचे (MVP) माजी उपसभापती डॉ.विलास बच्छाव, नानाजी दळवी, राघो अहिरे आदींच्या नेतृत्वाखालील रोडरोलर या निशाणीवर निवडणूक लढविणाऱ्या शेतकरी विकास पॅनलचे सहकारी संस्था मतदारसंघ सर्वसाधारण गटात किशोर जगन्नाथ खैरनार, प्रमोद वसंतराव बिरारी, डॉ. राहुल वसंतराव सोनवणे, महिला राखीव गटात सुरेखा अरुण अहिरे, ग्रामपंचायतीच्या मतदारसंघ सर्वसाधारण गटात हरिभाऊ पांडुरंग जाधव, विनोद सीताराम अहिरे विजयी झाले आहेत. तर व्यापारांचा मतदारसंघ अडते व व्यापारी गटात दीपक गोविंद सोनवणे, योगेश बाळासाहेब रौंदळ विजयी झाले आहेत. तर हमाल व तोलारी मतदारसंघाच्या (Constituency) हमाल व तोलारी गटात संदीप दगा साळे विजयी झाले आहेत. शहरातील वाणी मंगल कार्यालयात मंगळवार (दि.०१ एप्रिल) रोजी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ झाला होता. त्यानंतर दुपारी दोन वाजता अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.
दरम्यान, केवळ दळवी व समाधान वाघ या उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल केला. परंतु एका मताने डॉ. राहुल सोनवणे यांचा विजय जाहीर करण्यात आला. बाद मतांमुळे केवळ दळवी यांना पराभव स्वीकारावा लागला. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल मोरे बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे आदींनी कामकाजात सहभाग घेतला. पोलीस उपाधीक्षक नितीन गणापुरे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी बंदोबस्त ठेवला होता.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून निवडणुकीत सहभागी झाल्यानंतर शेतकरी, व्यापारी, हमाल -मापारी आदी सर्व घटकांचा योग्य समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला बिनविरोध निवडणूकीसाठी होणाऱ्या प्रयत्नात ज्यांनी दिशाभूल केली अशा घटकांवर मतदारांनी विश्वास दर्शविला नाही. सर्वसामान्य उमेदवारांच्या पाठीशी मतदार राहिल्यामुळे श्री यशवंत शेतकरी विकास पॅनल यशस्वी झाले.
राहुल सोनवणे, भाजप माजी शहराध्यक्ष
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत धनशक्तीचा जनशक्तीने पराभव केला असून खऱ्या अर्थाने लोकशाही जोपासली आहे.
डॉ. प्रशांत सोनवणे, शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख