नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शासनाने प्रयागराजच्या धर्तीवर सिंहस्थ प्राधिकरण तयार केले आहे. विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम (Dr. Pravin Gedam) यांच्याकडे जबाबदारी देण्यात आल्यामुळे महापालिकेने सादर केलेल्या सुमारे पंधरा हजार कोटींच्या आराखड्याला ब्रेक लागला आहे. परिणामी नाशिक महापालिकेला (Nashik NMC) विविध विकास कामांसाठी निधी मिळालेला नाही. त्यातच शहरातील रस्तेच खड्ड्यात गेले आहेत. त्यांच्या दुरुस्तीकडे महापालिकेने सपशेल दुर्लक्ष केले आहे. त्यासाठी महापालिकेला सिंहस्थाची प्रतीक्षा आहे की काय असा प्रश्न निर्माण आहे. तसे असेल तर मनपाकडून शहरातील सुमारे १७० किलोमीटरचे रस्ते दुरुस्तीच्या कामांना सिंहस्थाच्या मुहूर्ताची वाट पाहावी लागणार आहे.
महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून (Pwd Department) दोन हजार कोटींच्या रस्त्यांच्या कामांसाठी प्राकलन तयार करण्यात येत आहे. जवळपास १७० किलोमीटर लांबीच्या अंतर्गत व बाहेरील रिंगरोडसह २०१५ मध्ये तयार करण्यात आलेले रस्ते अधिक मजबूत करण्याचे कामाचे नियोजन करण्यात येत आहे. निधी न मिळाल्याने नवीन रिंगरोडसाठी मनपा भूसंपादन देखील करु शकत नाही. तरी रस्त्यांच्या कामांचा अभ्यास व नियोजन मात्र सुरू करण्यात आले आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांच्या मजबुतीची कामे वेळेत होणे आवश्यक असल्याने ऐनवेळी धावपळ नको म्हणून नवे रस्ते आणि जुन्या रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.
सिंहस्थात लाखो भाविक (Devotees) शहरात येणार असून, वाहतूककोंडी ही मोठी समस्या ठरू शकते. त्यामुळे मनपा बांधकाम विभागाकडून रस्त्यांचे जाळे विणण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. जेणेकरून सिंहस्थ कालावधीत एका ठिकाणाहून दुसरीकडे ये-जा करण्यासाठी चांगले रस्ते मिळावेत. तसेच मुख्य शहरातून जाणे टाळत इनर रिंगरोडचा वापर करून कोंडी टाळणे शक्य होईल. याकरता इनर रिंगरोडचेही नियोजन आहे. २०१५ च्या वेळी जे रस्ते होते त्यांच्याच मजबुतीकरणासह दुरुस्ती केली जाणार आहे.
निधी नसल्याने ठराविक काम
रस्ते रुंदीकरणासाठी भूसंपादन करावे लागेल. त्यासाठी आठशे ते हजार कोटींचा खर्च येण्याची शक्यता आहे. मात्र, निधी नसल्याने जुन्याच रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी प्राकलन तयार केले जाणार आहे. मागच्या सिंहस्थात शहरात ७२ किलोमीटरचे रस्ते उभारण्यात आले होते. यंदा ते धरून दीडशे किलोमीटर रस्त्यांचे जाळे उभारण्याचे नियोजन आहे. मागील सिंहस्थात पंधरा मीटरचे रिंगरोड उभारण्यात आले होते. त्यातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काहींची मागील १२ वर्षांपासून डागडुजीही झाली नाही.
मनपाला अद्याप विशेष सिंहस्थ निधी मिळालेला नाही. तरी आम्ही शहरातील बाहेरील व आतील रिंगरोडसह २०१५ मध्ये तयार झालेले जे जुने रस्ते आहेत त्यांचे मजबुतीकरण करण्याच्या दृष्टीने नियोजन करीत आहोत. यासाठी सुमारे २ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
संजय अग्रवाल, शहर अभियंता




