नाशिक रोड | प्रतिनिधी
वडनेर गेट परिसरात असलेल्या आर्टिलरी सेंटर जवळील ऑफिसर मेसच्या मागील बाजूस सहावा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला असून यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
गेल्या काही महिन्यापासून वडनेर दुमाला, वडनेर गेट, पिंपळगाव खांब, या भागात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्याचप्रमाणे वडनेर दुमाला, वडनेर गेट या ठिकाणी बिबट्याने दोन निष्पाप बालकावर हल्ला करून त्यांना जीवे ठार मारले होते. त्यानंतर या बिबट्यांना पकडण्यासाठी माजी नगरसेवक केशव पोरजे तसेच जगदीश पवार, योगेश गाडेकर, विक्रम कोठुळे, सुनीता कोठुळे, उत्तम कोठुळे आदींच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला होता, त्याचप्रमाणे निवेदन सुद्धा देण्यात आले होते.
दरम्यान या घटनेनंतर परिसरात १५ पिंजरे व १८ कॅमेरे लावण्यात आले होते. त्यामुळे गेल्या तीन महिन्यात आतापर्यंत पाच बिबटे जेरबंद झाले होते, तर शुक्रवारी पहाटे वडनेर गेट परिसरात असलेल्या आर्टिलरी सेंटर येथील ऑफिसर मेसच्या पाठीमागे लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात सहावा बिबट्या जेरबंद झाला आहे.
दरम्यान, हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्यानंतर नागरिकांनी गर्दी केली होती. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले व त्यांनी बिबट्याला ताब्यात घेऊन म्हसरूळ येथील वन्य प्राणी उपचार केंद्रात पाठविले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





