नाशिक | प्रतिनिधी Nashik
मराठा समाजाला आरक्षण देताना हैदराबाद गॅझेटमध्ये काही विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. व्हीजेएनटी बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गात स्थान देण्याची मागणी सुरू केली आहे. समाजासमाजामध्ये कटूता वाढेल असे निर्णय शासन घेत आह, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचे नाशकात आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी मुद्दा पेटला असताना बावनकुळे यांच्या नेतृत्वात ओबीसी समिती स्थापन करण्यात आली आहे. सगळे ओबीसी समितीत आहेत तर दुसरीकडे मराठा समाजासाठी जी समिती नेमण्यात आली, त्यात महाजन सोडले तर सगळे मराठा आहेत. राज्य सरकारच्या कमिट्या कधी एका समाजाच्या करायच्या नसतात.
राज्यस्तरीय शिबिरासाठी नाशिक हे ठिकाण निवडल्याबद्दल पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील महत्वाचे शहर नाशिक आहे. आपला पक्ष गांधी, नेहरू विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. नाशिकचा इतिहास पाहिला तर या जिल्ह्यात गांधी, नेहरू विचारधारा लोकांनी स्वीकारली होती. स्वातंत्र्यापूर्वी नाशिकला एक अधिवेशन झाले होते. कार्यकारिणी बैठक झाली होती. त्यावेळी महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. गांधी, नेहरूंचा विचार पुढे घेऊन जाण्याचे काम नाशिककरांनी केले. त्यानंतर भाऊसाहेब हिरे, गोविंदराव देशपांडे यांनी हा विचार पुढे नेला.
महाराष्ट्राच्या साहित्य परंपरेत कुसुमाग्रजांचे नाव घेतल्याशिवाय साहित्य पूर्ण होत नाही. यशवंतराव चव्हाणांसारखा मोठा नेता महाराष्ट्राला मिळाला. राज्याला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारा हा नेता होता. जवाहरलाल नेहरू यांनी भारताला सावरायचे असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बोलवायला हवे म्हणून यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीत बोलवून घेतले. त्यावेळी चव्हाण यांनी शपथ घेताच रात्रीतून चीनने सैन्य मागे घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी चव्हाण यांना खासदार म्हणून बिनविरोध नाशिककरांनी पाठवले होते.
उत्तम शेती करणारा हा जिल्हा आहे. नवनवीन प्रयोग नाशकात बघायला मिळतात. महाराष्ट्रातील शेतकरी संघर्ष करण्यासाठी शरद जोशी यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरला होता. याची सुरुवात नाशिकमध्ये झाली होती. पवार पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भास्कर भगरे, शोभा बच्छाव व राजाभाऊ वाजे यांच्या तिन्ही जागा आपल्या विचारधारेवर निवडून आल्या. आज केंद्र सरकार आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे. शेतमालाला भाव नाही. कांदा निर्यातीवर बंधन आहे. एवढा मोठा जिल्हा असताना या शेतकर्यांची जिल्हा मध्यवर्ती बँक थकबाकीमुळे डबघाईत गेली आहे. आज केंद्रातील सत्ता शेतकर्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही.
भारताच्या बाजूच्या देशांबद्दल पवार म्हणाले की, पाकिस्तान, नेपाळ अडचणीत आहे. बांगला देश उद्ध्वस्त झाला आहे. ज्याच्या स्वातंत्र्यसाठी भारताने खस्ता खाल्ल्या होत्या, तो आपल्या सोबत नाही. श्रीलंका देखील आपल्या सोबत नाही. पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित आहे.
सध्या विरोधक सरकारवर व्होेट चोरीचा आरोप करत आहेत. यावेळी ईव्हीएम मशीन मध्ये कसा घोळ आहे याबाबत प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. मत केल्यानंतर चिट्ठी कशी मशीन मध्ये पडते तसेच एकाला मतदान केले तरी दुसर्याला कसे मत पडते याचा नमुना यावेळी सादर करण्यात आला.
उद्या आक्रोश मोर्चा
शेतकरी कर्जमाफी, आत्महत्या, पीक विमा, कांदा निर्यातबंदी, अतिवृष्टीचं नुकसान, २१०० रुपये बहिणींना आणि युवांना रोजगार या मुद्द्यांवर सरकारला प्रश्न विचारत पक्षाच्यावतीने उद्या, सोमवारी नाशिकमध्ये भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.





