नाशिक | प्रतिनिधी
दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री चेहरे झाकलेल्या अज्ञात व्यक्तींनी लाठय़ा-काठ्यांनी विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेषी घोष हिच्यासह २० हून अधिक विद्यार्थी आणि प्राध्यापक जखमी झाले.
या घटनेचा संपूर्ण देशात निषेध केला जात आहे. नाशिकमध्येही आज दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निदर्शने झाली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नाशिकमधील विविध विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
यावेळी राष्ट्र सेवा दल, छात्रभारती, ए आय एस एफ, राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेसच्या कार्यकर्त्यांसह राजू देसले, विराज देवांग, तला शेख, समाधान बागुल, अविनाश दोंदे, योगेश कापसे, संविधान गांगुर्डे, चेतन गांगुर्डे, स्वप्नील घिया, सागर निकम, भूषण काळे, प्रसाद देशमुख, भूषण काळे, समाधान बागुल, विराज देवांग, तला शेख, हरीश रहाणे, अभिषेक शिंपी, दीपक पगारे यांची उपस्थिती होती.
सायंकाळी सव्वासहा वाजता संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर अहमद शेख यांची ‘हम देखेंगे’ या कवितेचे गायन करण्यात आले. निदर्शने केल्यानंतर राष्ट्रगीताने आंदोलनाचा समारोप करण्यात आला. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नाशिक शहर पोलिसांनी याठिकाणी बंदोबस्त तैनात केला होता.
राष्ट्रव्यापी संपात विद्यार्थी संघटना सहभागी होणार
येत्या 8 तारखेला होत असलेल्या राष्ट्रव्यापी बंद मध्ये नाशिकमधील सर्व विद्यार्थी संघटना सहभागी होणार असल्याचे यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच नाशकातील महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहनदेखील करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.