नाशिक | प्रतिनिधी | Nashik
बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मिक कराड याला बीड कारागृहात गीते गँगचा धोका असल्याच्या शक्यतेतून त्याला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात हलविण्याची चर्चा आहे. मात्र, कराडचे कट्टर वैरी असलेली आठवले गँग आधीपासूनच नाशिक कारागृहात असल्याने, गँगवार भडकण्याची भीती आहे. त्यामुळे कराडला नाशिकला (Nashik) न आणता इतरत्र पाठविणार असल्याचे समजते. मात्र, वरील चर्चेवरुन कारागृह प्रशासनाचा ताप वाढला आहे.
१ एप्रिल रोजी बीड कारागृहात वाल्मीक कराड (Walmik Karad) व महादेव गिते यांना आठवले टोळीने मारहाण केली होती. त्यामुळे बीड कारागृहात (Beed Jail) गँगवार भडकण्याची शक्यता असल्याने, आठवले टोळीतील तिघांनाही नाशिक कारागृहात हलविण्यात आले होते. आता गीते गँग आणि कराड गँगमधील संघर्ष वाढल्याची चर्चा आहे. सध्या बीड कारागृहात वाल्मीक कराडला योग्य सुरक्षा व्यवस्था आहे.
मात्र, त्याचा बीड तुरुंगातील (Beed Jail) अधिकचा मुक्काम बेतण्याची भीती आहे. तर त्याला नाशिकमध्ये (Nashik) हलविल्यास पुन्हा आठवले गँगकडून हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कराडला नाशिकला हलविण्याबाबतचा निर्णय बदलला जावू शकतो व त्याला बीड किंवा अन्य कारागृहात हलविले जाऊ शकते. दरम्यान, बीड किंवा नाशिकसह अन्य कारागृह प्रशासनाने या ‘शफल शिफ्टिंग’ ला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
आधी कळविले जाते…
कराडला नाशिक करागृहात हलविणार असल्याचे वृत्त समोर येत असले तरी, कारागृह प्रशासनास यासंदर्भात कोणतीही माहिती नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. बंदीवान वा कैद्याचे प्रत्यार्पण करतांना, त्याबाबत कारागृह प्रशासनाशी संबंधित पोलीस वा कारागृह पत्रव्यवहार करतो. एखाद्या कैद्याला सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने हलविण्याचे ठरविल्यास, स्थानिक न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. तसेच, ज्या कारागृहात हलवायचे आहे, त्या कारागृह प्रशासनाला दुरध्वनीद्वारे अर्जंट माहिती द्यावी लागते. तसेच कैद्याला आणल्यानंतर परवानगीबाबतचे संपूर्ण कागदपत्रे कारागृह प्रशासनाकडे जमा करावी लागतात.




