नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिकची (Nashik) विमानसेवा सक्षमपणे काम करत असून इंडिगो विमान कंपनीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात सुमारे तीन लाख प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतल्याने पुन्हा एकदा नाशिकची प्रवासी क्षमता अधोरेखित होत आहे.
नाशिकला विमानसेवा (Airlines) सुरू व्हावी यासाठी उद्योजक, व्यापारी व लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा चालवला होता. त्यासाठी अनेक विमान कंपन्यांना पाचारण करून त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात होता. वेळोवेळी विविध विमान कंपन्यांच्या वरिष्ठांच्या माध्यमातून सेवा सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या प्रवाशांच्या शक्यतेचे लेखी आश्वासन निमाच्या माध्यमातून देण्यात आले होते. अनेक कंपन्यांनी नाशिकहून विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही ना काही कारणांमुळे त्यांच्या सेवा ठप्प झाल्या.सरते शेवटी नाशकात दाखल झालेल्या इंडिगो विमान कंपनीने खंबीरपणे पाय रोवत नाशिकच्या विमानसेवेला खरा आकार दिला.
मागील वर्षभरात इंडिगोच्या (indigo) माध्यमातून २ लाख ८७ हजार ९०८ नाशिककरांनी विमानसेवेचा लाभ घेतला. त्यात सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये सर्वाधिक एक लाख २४ हजार ७५६ प्रवासी विमानाने प्रवास केला. मागील वर्षात सर्वात कमी प्रवाशांची संख्या ही एप्रिलमध्ये १५,६४९ एवढी होती. बाकी प्रत्येक महिन्यामध्ये (Month) प्रवासी संख्या ही २० हजारांपेक्षा जास्तच राहिलेली आहे. इंडिगो विमान कंपनीने वेळोवेळी केलेले प्रयत्न आणि विमानसेवांच्या विविध शहरांना जोडणीसाठी उपलब्ध केलेली सेवा यामुळे पर्यटकांची संख्या वाढल्याचे बोलले जात आहे.
येणाऱ्या काळात नाशिकमध्ये एअरबसच्या सर्व्हिस सेंटर सुरू झाल्यास नाशिकहून पर्यटकांना नवीन पर्याय निर्माण होतील. त्यामुळे अर्थातच प्रवाशांची संख्या वाढणार आहे.
मनीष रावल, अध्यक्ष, एव्हिएशन कमिटी, निमा, आयमा