सुरगाणा | वार्ताहर | Surgana
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्याच्या (Nashik District) सुरगाणा तालुक्यात (Surgana Taluka) अवकाळी पावसाने थैमान घातले असून, यामुळे शेतकरी राजावर मोठे संकट कोसळले आहे. कापणीस आलेले भात पीक शेतातच भिजून पूर्णपणे खराब झाल्याने शेतकऱ्यांच्या (Farmer) हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून, सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सुरगाणा तालुक्यात भात (Rice) हे महत्त्वाचे पीक असून, यंदा पीक चांगले आले होते. मात्र, ऐन कापणीच्या हंगामात पावसाने हजेरी लावली आणि होत्याचे नव्हते झाले. पळसन, उंबरठाण, ठाणगाव, बोरगाव, शिदे दिगर,मनखेड, बा-हे,यांसारख्या अनेक प्रमुख भागांत भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
तसेच तयार झालेले भात पीक शेतातच कापणीसाठी ठेवले होते, परंतु अवेळी आलेल्या जोरदार पावसामुळे ते पूर्णपणे भिजून गेले आहे.तर संततधार पावसामुळे भाताच्या लोंब्यांमध्ये पाणी साचले असून, अनेक ठिकाणी भात सडण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती शेतकरी देत आहेत.याशिवाय जो धान वाचला आहे, त्याची गुणवत्ता पूर्णपणे घसरल्यामुळे बाजारात कवडीमोल दराने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. यामुळे झालेला खर्चही निघणार नसल्याची भीती शेतकरी (Farmer) व्यक्त करत आहेत.
दरम्यान, शेतकरी संघटनांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले आणि तातडीने कार्यवाही केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या परिस्थितीवर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तातडीने पंचनामा करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा
या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. वर्षभराची मेहनत आणि गुंतवणूक पाण्यात गेल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे निराश झाला आहे. त्यामुळे, संतप्त शेतकऱ्यांनी आणि स्थानिक शेतकरी संघटनांनी प्रशासनाकडे जोरदार मागणी केली आहे. तसेच झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने कोणत्याही दिरंगाईशिवाय तात्काळ पंचनामे करावेत. त्याबरोबरच पंचनाम्यानंतर शेतकऱ्यांना त्वरित आणि पुरेशी नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणीही करण्यात आली.




