ओझे l वार्ताहर | Oze
गेल्या आठ दिवसापासून गावाला पाणी (Water) नाही गावातील महिलांनी (Women) मागणी केली आणि शेवटी टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आल्याची घटना दिंडोरी तालुक्यातील दहेगाव येथे उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गावातील (Village) बोअरवेलचे पाणी आठ दिवसापूर्वी संपले आणि दुसरा पर्याय हा ओझरखेड धरण होता. पण जिथं पाणी पुरवठा योजना आहे ती संपूर्ण पाण्यात आहे. शासनाच्या इंजिनिअर मंडळीचे आभार मानले पाहिजे. जेव्हा एक रोटेशन जाईल धरणाचे तेव्हा ती योजना सुरू होते आणि धरणाचे शेवटचे रोटेशन जाईल तेव्हा परत ती योजना कोरडी पडते, अशी परिस्थिती दहेगावची आहे.
दरम्यान, येथील ग्रामस्थ अजित कड यांनी सांगितले की, शासनाकडे गेल्या तीन वर्षापासून याबाबत पाठपुरावा सुरू आहे. आम्हाला नवीन जलजीवन योजना मंजूर करावी त्यासाठी जागा देखील ग्रामस्थांनी दिलेली आहे. जी कागदपत्रे आवश्यक आहे त्याची देखील संपूर्ण पूर्तता करण्यात आली आहे. तरी अद्याप आमच्या गावातील योजनेला मंजुरी दिलेली नाही. तरी शासनाने सत्य परिस्थिती जाणून घेऊन लवकरात लवकर सदरील योजनेला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, असे त्यांनी म्हटले.
गेल्या आठ दिवसापासून गावाला पाणी नाही. बोअरवेल आटून गेली आणि जी विहीर आहे ती पाण्यात बुडून गेली. आम्हाला एक महिनाभर टँकरने पाणी पुरवठा करावा लागेल.
मीनाबाई संजय धुळे, ग्रामस्थ




