नाशिक | Nashik
महानगरपालिकेची निवडणूक (Nashik NMC) जाहीर झाल्यानंतर शिवसेना (उबाठा) पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवारांच्या (Candidate) मुलाखतींना शुक्रवार (दि.१९) पासून प्रारंभ झाला. या मुलाखती शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात ज्येष्ठ नेते रवींद्र मिर्लेकर यांच्या उपस्थितीत घेण्यात येत आहेत.
मागील निवडणुकीच्या तुलनेत मुलाखतींच्या (interviews) पहिल्या टप्प्यात नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नवीन नाशिक आणि सातपूर या दोन विभागातील १२० इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सकाळच्या पहिल्या सत्रात नवीन नाशिक परिसरातील प्रभाग २४, २५, २७, २८, २९ व ३१ मधील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. दुपारच्या सत्रात सातपूर परिसरातील प्रभाग ८, ९, १०, ११ व २६ येथील १२० इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या.
दरम्यान, या मुलाखती घेण्यासाठी शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांच्यासह शिवसेना जिल्हाध्यक्ष डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गिते, जिल्हाप्रमुख जयंत दिंडे, पश्चिम विभागाचे संपर्क प्रमुख विजय काळदाते, भारती ताजनपुरे, स्वाती पाटील, राणी गवळी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, महेश बडदे, विष्णूपवार, सुभाष गायधनी, सुनील गोडसे, राजू वाकसरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मुलाखतींचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. प्रत्येक मनपा निवडणुकीत शिवसेना भवनाला ज्येष्ठ शिवसैनिकांचा (Shivsainik) गराडा पडत होता.
आज नाशिक पूर्वच्या मुलाखती
शनिवारी (दि.२०) नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील पंचवटी व नाशिकरोड विभागातील सुमारे २०० इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. सकाळच्या सत्रात पंचवटी परिसरातील प्रभाग १, २, ३, ४, ५ व ६ तसेच दुपारच्या सत्रात नाशिकरोड परिसरातील प्रभाग १७, १८, १९, २०, २१ व २२ मधील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत.
महाविकास आघाडीचा निर्णय महत्त्वाचा
महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवण्याबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर निवडक जागांसाठी उमेदवारांची निवड आज घेतलेल्या मुलाखतींच्या आधारे केली जाणार आहे. दरम्यान, स्थानिक पातळीवर स्वबळाच्या तयारीनुसार इच्छुकांची बलस्थानाची नोंदणी करून घेण्यात आली आहे. पुढील सर्व निर्णय पक्षश्रेष्ठी आणि उत्तर महाराष्ट्र संघटक उपनेते रवींद्र मिर्लेकर यांच्या मार्गदर्शनानुसार घेतले जातील, अशी माहिती जिल्हाध्यक्ष डी. जी. सूर्यवंशी यांनी दिली.




