नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महापालिका निवडणुकीसाठी (NMC Election) अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस उरले असताना महायुतीमधील (Mahayuti) जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. काल (शनिवारी) शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र येत जागावाटपावर चर्चा केली होती. त्यामुळे नाशिकमध्ये एकप्रकारे भाजपला आव्हान दिल्याची चर्चा सुरु झाली होती. यानंतर आज (रविवारी) भाजपने नरमाईची भूमिका घेत मंत्री गिरीश महाजन हे शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) आज सायंकाळी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांशी महापालिका निवडणुकीच्या जागावाटपाबाबत बैठक घेणार आहेत. या बैठकीस स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते.याआधी महायुतीमधील नेत्यांच्या झालेल्या बैठकीत भाजपकडे ६५ विद्यमान नगरसेवक असल्याने ते ८० पेक्षा जास्त जागांवर अडून बसले होते. शिवसेनेने (शिंदे गट) ४५ जागांची मागणी केली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ३० जागांसाठी आग्रही होते. परंतु, भाजपने शिवसेना (Shivsena) ३५ आणि राष्ट्रवादीला अवघ्या सहा जागांचा प्रस्ताव दिला होता.
हे देखील वाचा : Nashik Politics : नाशकात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादीची हातमिळवणी! जागांचा तिढा मात्र कायम
यानंतर भाजपकडून सन्मानजनक जागा मिळत नसल्याने संतापलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शनिवारी एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक घेतली. या बैठकीला मंत्री दादा भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, आ. सरोज अहिरे, आ. हिरामण खोसकर, माजी खासदार हेमंत गोडसे, समीर भुजबळ, विजय करंजकर, अजय बोरस्ते, राजू लवटे, रंजन ठाकरे यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सदर बैठकीत प्रभागात अडचणी आहेत, तेथे समन्वय साधून उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच भाजपकडून सन्मानजनक तोडगा न निघाल्यास शिवसेना-राष्ट्रवादी (Shivsena and NCP) एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर आज मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावल्याने या बैठकीत जागावाटपावर आजच्या बैठकीत तरी तोडगा निघतो का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शिवसेना-राष्ट्रवादीचे संभाव्य जागावाटप समोर
भाजपकडून जागा वाटपाबाबत लवकर निर्णय घेण्यात येत नसल्याने शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी एक बैठक घेऊन महापालिकेच्या १२२ जागांचे सूत्र निश्चित केल्याचे समजते. त्यानुसार शिंदेंची शिवसेना ८०, अजित पवारांची राष्ट्रवादी ३५ आणि उर्वरित जागा मित्र पक्षांसाठी सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.




