पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
म्हसरूळ-मखमलाबाद सीमेवरील मतदारांच्या (Voter) वतीने सामाजिक कार्यकर्ते प्रविण रमेश जाधव यांनी प्रभाग क्रमांक १ मधील प्रारूप मतदारयादीतील त्रुटींवर तब्बल ८०४ हरकती आज (सोमवारी) पंचवटी विभागीय कार्यालयात दाखल केल्या. किशोर सूर्यवंशी मार्गालगतचे शिवसमर्थ नगर, शिवतेज नगर, दुर्गा नगर, ओंकार नगर, वेदनगरी, विंध्यवासिनी सोसायटी आदी परिसर प्रभाग १ च्या हद्दीत येत असूनही येथील नागरिकांची नावे अनेक वर्षांपासून प्रभाग ६ मध्ये समाविष्ट होत असल्याची तक्रार त्यांनी केली. यामुळे या सुमारे ३ हजार मतदारांना आपल्या प्रभागातील उमेदवाराला मतदान करण्याचा मूलभूत हक्क नाकारला जात असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
यावेळी ते म्हणाले, “आतापर्यंत ८०४ हरकती दाखल केल्या असून, अजून किमान ४०० हरकती दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हरकतीसाठीचा कालावधी कमी असल्याने अनेक मतदारांपर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे हरकतीसाठीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवावी,” अशी मागणीही त्यांनी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) केली.
तसेच स्थानिक निवडणुकांमध्ये प्रभागनिहाय मतदारयाद्यांतील (Voter List) अशा विसंगतीमुळे सीमावर्ती मतदार विकास आणि प्रतिनिधित्वापासून वंचित राहतात, अशीही त्यांनी यावेळी खंत व्यक्त केली. हरकती दाखल करताना अविनाश लोखंडे, शिवाजी शिंदे, अपूर्व शास्त्री, गोटीराम गडकरी यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.




