Friday, May 17, 2024
Homeअग्रलेखभारताचे पदक-शतक!

भारताचे पदक-शतक!

जगाला करोना महामारीत ढकलणारा देश म्हणून दोन वर्षांपूर्वी चीनला जगाच्या रोषास सामोरे जावे लागले. त्याच चीनने हांगझाऊ शहरात 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा भरवून आपाल्या क्रीडाप्रेमाची आणि आदरातिथ्याची वेगळी ओळख जगाला करून दिली आहे. यजमान चीन या स्पर्धेत पदके पटकावण्यात अव्वल ठरला. 200 सुवर्णपदके, 111 रौप्य आणि 71 कांस्य अशा 382 पदकांची घसघशीत कमाई चीनने केली. आशियाई वा अन्य क्रीडा स्पर्धांमध्ये चीन, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांमध्ये पदकांची लयलूट करण्यात नेहमीच चुरस पाहायला मिळते. ती याही स्पर्धेत दिसली.

चीनपाठोपाठ जपानने 51 सुवर्णांसह 186 तर दक्षिण कोरियाने 42 सुवर्णांसह 190 पदके पटकावली. भारताच्या दृष्टीनेसुद्धा यंदाची आशियाई क्रीडा स्पर्धा ऐतिहासिक ठरली आहे. भारताने 107 पदकांची घसघशीत कमाई करून पदतालिकेत चौथे स्थान पटकावले आहे. 28 सुवर्ण तसेच 38 रौप्यपदके भारताच्या खिशात पडली आहेत. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी पदके जिंकण्याची जिगर भारतीय खेळाडूंनी दाखवली. 6 सुवर्णांसह 12 पदके भारताला मिळाली. भारतीय खेळाडूंची यंदाच्या स्पर्धेतील ही कामगिरी पाहता पुढच्या स्पर्धेत पहिल्या तीन संघाना आव्हान देण्याच्या दिशेने भारताने टाकलेले हे दमदार पाऊल म्हटले पाहिजे. क्रिकेट विश्वात मर्दमुकी गाजवणार्‍या भारताने आशियाई स्पर्धेतही आपला दम दाखवला. महाराष्ट्राचा युवा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात भारतीय संघाने अफ़गाणिस्तानविरुद्ध खेळताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीत भारताला 41 वर्षानंतर प्रथमच पदक मिळाले. तेही सुवर्ण असल्याने हा विजय अद्वितीय ठरला. विशेष म्हणजे भारताच्या पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी सुवर्णपदक पटकावून शेवटचा दिवस संस्मरणीय केला. महिला हॉकी संघाला कांस्य मिळाले. आतापर्यंतच्या आशियाई स्पर्धांमधील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. जाकार्ता येथे 2018 मध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने 70 पदके मिळवली होती. आता मारलेली लांबउडी भारताला शतकपार घेऊन गेली आहे. आशियाई स्पर्धेतील भारताच्या यशात महाराष्ट्रातील खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले.

- Advertisement -

नाशिककरांना अभिमान वाटावा अशी कामगिरी नाशिकच्या खेळाडूंनी केली. सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराती याच्या नेतृत्वात भारतीय बुद्धिबळ संघाने सांघिक गटात अंतिम फेरीत फिलिपिन्स संघाचा 3-1 असा पराभव करून देशाला रौप्यपदक मिळवून दिले. नाशिकचा कबड्डीपटू आकाश शिंदेचा समावेश असलेल्या भारतीय संघाने सुवर्णपदक पटकावले. नाशिकच्या शैलजा जैन या इराण महिला कबड्डी संघाच्या प्रशिक्षक आहेत. त्यांच्या कुशल मार्गदर्शनात इराणला कांस्य मिळाले. नागपूरच्या ओजस देवताळेने तीरंदाजीत सुवर्ण जिंकले. क्रिकेट, कबड्डी, हॉकी, नेमबाजी, घोडेस्वारी, टेनिस, स्क्वॅश, अथेलेटिक्स, बॅडमिंटन, रोविंग, सेलिंग, गोल्फ, मुष्टियुद्ध, ब्रिज, बुद्धिबळ, रोलर स्केटिंग, आर्चसी, कुस्ती अशा विविध क्रीडा प्रकारांत भारतीय खेळाडूंनी चमक दाखवली. सांघिक खेळांप्रमाणेच वैयक्तिक खेळांतही भारतीय खेळाडू जिद्दीने खेळले आणि त्यांनी पदके मिळवली. देशासाठी आपण खेळत आहोत, ही देशभक्तीची भावना प्रत्येक खेळाडूच्या मनात रुजली होती हेच भारताच्या या चमकदार यशातून स्पष्ट होते. भारताच्या यशात स्पर्धेच्या मोहिमेवर गेलेल्या 500हून अधिक खेळाडूंच्या सामुदायिक यशाचा वाटा आहे. नावे तरी कोणाकोणाची घ्यावीत? प्रत्येकाचीच कामगिरी अजोड आहे. पदकांचे शतक झळकावण्यात मोलाचे योगदान देऊन भारताचा तिरंगा आशियात डौलाने फडकावणार्‍या सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन!

- Advertisment -

ताज्या बातम्या