नाशिक | प्रतिनिधी
नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला गुरुवारी रात्री छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आले आहे. अटकेनंतर आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. याच प्रकरणात आता निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमध्ये इतके दिवस आश्रय कोणी दिला? याबाबत महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी सखोल तपास केला जात आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी केलेल्या तपासात एका एमआयएम पक्षाच्या नगरसेवकाने निदा खान हिला आश्रय दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी मतीन पटेल यांना नोटीस बजावली आहे. पोलिसांनी मतीन पटेल यांचा मोबाईलही जप्त केला आहे.
निदा खान मतीन पटेलच्या संपर्कात
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक टीसीएस प्रकरणातील निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये होती. ती नगरसेवक मतीन पटेल यांच्या संपर्कात आल्यानंतर निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये आली. मतीन पटेल यांनी दोन महिन्यांपूर्वी नारेगाव येथील कौसर पार्क परिसरात एक नवीन घर (फ्लॅट) विकत घेतले होते. याच घरात निदा खानला ठेवण्यात आले होते. आता या प्रकरणी नगरसेवक मतीन पटेल यांना नाशिक पोलिसांनी सह संशयित केले आहे.
पोलिसांनी पाळत ठेवत निदाला अटक केली
पोलिसांनी मागील २ दिवसांपासून निदा खानवर पाळत ठेवली होती. मिळालेल्या माहितीनुसार, एक मे २०२६ पासून ती या परिसरात राहत होती अशी माहिती पोलिसांकडे होती. मात्र याबाबत त्या परिसरातील नागरिकांना, आजूबाजूच्या लोकांना कोणतीही कल्पना नव्हती. या घरामध्ये निदा खान ही आई-वडील, भाऊ आणि मावशी यांच्यासोबत राहत होती.
नाशिक पोलिसांनी तातडीने ही माहिती संभाजीनगर पोलिसांना कळवली. त्यानंतर नाशिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने सलग दोन दिवस या इमारतीवर पाळत ठेवली. साध्या वेशातील जवळपास २० महिला व पुरुष पोलिसांनी रेकी करून निदा खान हिला अटक केली.
https://www.facebook.com/share/v/1HuEniLPLZ
निदा खानने अटकेपासून वाचण्यासाठी गरोदर असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र देत अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. नाशिक न्यायालयाने अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळल्यानंतर तीने उच्च न्यायालयात धाव घेऊन अटक पूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयाने हे प्रकरण ‘आंतरराष्ट्रीय सिंडिकेट’शी संबंधित असल्याचे सांगत तिचा जामीन फेटाळला. निदाच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, परकीय निधी आणि धर्मांतराचे जाळे यावर प्रकाश पडण्याची शक्यता आहे.





