Thursday, October 31, 2024
HomeनाशिकNashik Political : नाशिक पूर्वत १५ तर पश्चिममध्ये २२ अर्ज वैध; इगतपुरीत...

Nashik Political : नाशिक पूर्वत १५ तर पश्चिममध्ये २२ अर्ज वैध; इगतपुरीत एका उमेदवाराचा अर्ज बाद

नाशिक | Nashik

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत नवनवीन घडामोडींनी चर्चेत राहिलेल्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात आदिती ढिकले, चंद्रभान पुरकर, चंद्रकांत साडे व राजेश लांडगे या चौघांचे अर्ज बाद ठरले आहेत. आता १५ उमेदवारांचे अर्ज शिल्लक असून, त्यापैकी किती उमेदवारांची माघार होते याकडे लक्ष लागून आहे. भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेले गणेश बबन गिते यांच्या विरोधात इगतपुरीचे गणेश बबन गिते यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने या मतदारसंघात ‘भगरे पॅटर्न’ची चर्चा सुरु झाली आहे.

- Advertisement -

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणी आलेल्या तीन इच्छुकांना माघारी फिरावे लागले. त्यामुळे अखेरपर्यंत १९ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम हलवळे यांनी बुधवारी अर्जाची छाननी केली. यात राष्ट्रवादीचे गणेश गिते यांच्या अर्जाविषयी अॅड. राहुल ढिकले यांच्यावतीने आक्षेप घेण्यात आला. गिते यांनी अर्जातील निवडणूक आयोगाने अपात्र ठरवले आहे का? या रकाण्यात ‘निरंक’ असे लिहिले आहे. तिथे ‘लागू नाही असे हिणे अपेक्षित होते.

त्याबाबत मनसेचे प्रसाद सानप यांनी घेतलेला आक्षेप फेटाळण्यात आला. त्यामुळे गितेंचा अर्ज वैध ठरला. याठिकाणी गणेश गितेंसह अॅड. जालिंदर ताडगे उपस्थित होते. राजेश लांडगे हे छत्रपती संभाजीनगर येथील वैद्यकीय महाविद्यालयात शासकीय नोकरीला आहेत. तेथील राजीनामा दिल्याचे प्रमाणपत्र त्यांनी विहित मुदतीत सादर केले नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार अॅड. राहुल ढिकले यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आल्याने पत्नी आदिती ढिकले यांचा ‘डमी’ अर्ज अवैध ठरला.

तसेच निफाडचे चंद्रभान पूरकर यांचे नाव तेथील मतदार यादीत असल्याचा पुरावा त्यांना सादर करता आला नाही. त्यांच्या अर्जावर सूचकांची स्वाक्षरी नव्हती. त्यामुळे हा अर्ज बाद झाला. देवळालीचे रहिवासी चंद्रकांत साडे हे एनटी प्रवर्गातील असताना त्यांनी केवळ पाच हजार रुपये अनामत रक्कम भरली. देवळालीच्या मतदार यादीत नाव समाविष्ट असल्याचा पुरावा त्यांना देता आला नाही, त्यामुळे त्यांचाही अर्ज बाद ठरवण्यात आला. अर्ज छाननीच्या प्रक्रियेप्रसंगी मनसेचे प्रसाद सानप, चंद्रकांत थोरात, गणेश गिते, अॅड. जालिंदर ताडगे, रवींद्र पगारे आदी उपस्थित होते.

नाशिक पश्चिममध्ये २२ अर्ज वैध

नाशिक पश्चिम विधानसभा निवडणुकीसाठी २२ उमेदवारांद्वारे ३८ अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पक्षाच्या नावाने अर्ज दाखल केलेल्या मात्र, अर्जासोबत एबी फॉर्म नसल्याने ते अर्ज बाद करण्यात आले. इतर सर्व अर्ज मंजूर करण्यात आले. त्यामुळे रिंगणात २२ उमेदवार शिल्लक राहिलेले आहेत. निवडणूक रिंगणात २२ उमेदवार असल्याने ४ नोव्हेंबरच्या माघारीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मतदानासाठी एका इव्हीएम मशिनवर १६ नावे देता येतात. त्यामुळे या मतदार संघात दोन इव्हीएम लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी हर्षा सुधाकर बडगुजर यांनी आपला उमेदवारी अर्ज डमी अर्ज म्हणून भरलेला होता. तो त्यांनी काल मागे घेतल्याने माघारीचा शुभारंभ झाल्याचे बोलले जात आहे.

नाशिक मध्यत एक अर्ज अवैध

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र छाननीअंती अपक्ष उमेदवार तोफिक अल्लाउद्दीन पठाण यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. काँग्रेसच्या बंडखोर डॉ. हेमलता पाटील व गुलजार कोकणी यांनी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म जोडला नसल्याने त्यांचा अर्ज बाद केला असला तरी त्यांच्या अपक्ष उमेदवारी अर्ज वैध असल्याने त्यांचे आव्हान कायम राहिलेले आहे. मतदारसंघात २१ उमेदवार रिंगणात असून साऱ्यांच्याच नजरा ४ नोव्हेंबरच्या माघारीकडे लागल्या आहेत.
नाशिक प्रांताधिकारी कार्यालयात बुधवारी (दि. ३०) मध्य मतदारसंघाची अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी अर्पित चौहाण व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शोभा पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबविण्यात आली. मतदारसंघात २२ उमेदवारांनी एकूण ३१ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी अपक्ष पठाण यांच्या अर्जात १० सूचकांची स्वाक्षरी नसल्याने त्यांचा अर्ज बाद ठरला. तर डॉ. पाटील व गुलजार कोकणी यांनी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जोडला नसल्याने या दोघांचे पक्षीय अर्ज बाद करत अपक्ष अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यामुळे हे दोन्ही उमेदवार आता अपक्ष म्हणून मतदारांना सामोरे जातील. दरम्यान, छाननीनंतर मतदारसंघात २१ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. चार नोव्हेंबरला माघारीनंतरच लढतीचे खरे चित्र स्पष्ट होईल.

इगतपुरीत २८ उमेदवारांचे अर्ज वैध

इगतपुरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उषा बेंडकोळी यांनी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्जासोबत एबी फॉर्म न जोडल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. त्यामुळे या मतदारसंघात २८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. आमदार हिरामण खोसकर यांनी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केल्याने या जागेवर काँग्रेसने लकी जाधव यांना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसमधील इच्छुकांनी नाराजी दर्शवत स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसच्या इच्छुक उषा बेंडकोळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करतांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या मुदतीपर्यंत एबी फॉर्म न जोडल्याने त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या