नाशिक | प्रतिनिधी | Nashik
तब्बल तीन वर्षांनी होणाऱ्या नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Nashik NMC Election) मंगळवारी (दि.२३) उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृतीच्या पहिल्याच दिवशी १२२ जागांसाठी १७६३ अर्जाची विक्री झाली. तर पंचवटी विभागातून एक उमेदवारी अर्ज (Application for Candidacy) दाखल झाला आहे. प्रभाग क्र. १४ मध्ये सर्वाधिक १४२ अर्जाची विक्री झाली.
पहिल्या दिवशी विक्री झालेल्या अर्जाच्या आकडेवारीमुळे इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता स्पष्टपणे दिसून आली असून, आगामी दिवसांत अर्ज दाखल करण्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. शहरातील प्रत्येक तीन प्रभागांसाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून त्यांना स्वतंत्र कार्यालय देण्यात आले आहे, तर सातपूर विभागात एका अधिकाऱ्याकडे चार प्रभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. अर्जाची ५० रुपये किंमत असून त्यासोबत माहिती पुस्तिका १०० रुपये दराने उपलब्ध आहे. विविध कार्यालयांत सकाळपासूनच उमेदवार व त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
दरम्यान, प्रभाग क्र. १४ मध्ये सर्वाधिक १४२ अर्जाची विक्री झाली, तर प्रभाग क्र. २९ मध्ये १४१, प्रभाग क्र. २७ मध्ये ११०, प्रभाग क्र. २५ मध्ये ९९ आणि प्रभाग क्र. ३१ मध्ये ९५ अर्ज विकले गेले. सर्वात कमी अर्ज विक्री प्रभाग क्र. ७ मध्ये २२, प्रभाग क्र. २२ मध्ये २६ आणि प्रभाग क्र. १३ मध्ये ७९ अर्जाची झाली, उमेदवारी अर्जाची छाननी ३१ डिसेंबरला होईल, तर उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख २ जानेवारी आहे. निवडणूक चिन्हवाटप ३ जानेवारीला होणार आहे. मतदान (Voting) १५ जानेवारीला सकाळी ७.३० वाजेपासून होईल.




