पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात (Nashik East Constituency) उभा केलेला अपक्ष गणेश बबन गिते या डमी उमेदवाराबद्दलच्या माहिती अधिकारात महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गिते (Ganesh Gite) यांनी माहिती अधिकारांतर्गत मागवली होती. त्यात डमी उमेदवाराचा अर्ज दाखल करताना सोबत असलेली तसेच गोकुळ गिते यांच्या वाहनावर हल्ल्याप्रसंगी टोळक्यात असणारी व्यक्ती एकच असल्याचे व्हिडिओ फुटेजमधून निदर्शनास आले आहे. त्यामुळे डमी उमेदवार भाजप उमेदवारानेच उभा केला असल्याचे दिसून येत असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गिते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गिते यांनी गेल्या १५ दिवसांपासून मला ढिकले समर्थकांकडून माझ्या सहकाऱ्यांना सातत्याने त्रास दिला जात असून पराभवाच्या भीतीने ढिकले यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने ते रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप गणेश गिते यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला. नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघात गणेश बबन गिते नावाचे दोन उमेदवार उभे असून गणेश भाऊ बबन गिते हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. याबाबत गणेश गिते यांनी सांगितले की, नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात गणेश गिते नावाचा डमी उमेदवार उभा करण्यात आला आहे. हा उमेदवार राहुल ढिकले यांनीच उभा केल्याचे आमचे म्हणणे अखेर सिद्ध झाले आहे. यापूर्वी ढिकले कुटुंबाकडून याबाबत इन्कार करून आमचा संबंध नसल्याचे सांगितले होते.
त्यांनतर आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी (Election Adjudicating Officer) कार्यालयातून मिळवलेल्या फुटेजनुसार गणेश गिते या डमी उमेदवाराचा अर्ज दाखल करताना राहुल ढिकले यांचा सहकारी सौरभ सोनवणे व आमदार ढिकले यांचे बंधू सुनील ढिकलेही यावेळी दालनात उपस्थित होते. ढिकले यांनी आमदारकीच्या पाच वर्षात जनतेचे एकही काम न केल्यामुळे त्यांना आता असा गावगुंड व डमी उमेदवारांचा आधार घेण्याची वेळ आली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी खा. राजाभाऊ वाजे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार, शिवसेना उबाठाचे सुनील बागुल, छबू नागरे, कल्पना पांडे व सहकारी उपस्थित होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा