मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon
महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी (Mayor and Deputy Mayor Election) काल (मंगळवारी) अंतिम मुदतीत शिवसेनेने महापौर व उपमहापौरपदासाठी तर एमआयएम पक्षाने उपमहापौर पदासाठी नामांकन अर्ज दाखल केले. शिवसेना व एमआयएमने मैदानात येत निवडणुकीत चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे आगामी तीन दिवसात बहुमताचे संख्याबळ जुळविण्यासाठी शिवसेना व एमआयएमतर्फे होणाऱ्या हालचालीकडे राजकीय धुरीणांसह संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.दरम्यान, इस्लाम-समाजवादी पार्टी सेक्युलर फ्रंटकडे काँग्रेसच्या तीन नगरसेवकांच्या मदतीने बहुमतासाठी आवश्यक ४३ नगरसेवक आहे. ही निवडणूक विचारधारेशी संबंधित असल्याने कोण कुणाबरोबर जाणार याकडे संपूर्ण शहरवासियांचे लक्ष आहे.
बहुमत संख्याबळ प्राप्तीमुळे सेक्युलर फ्रंटचेच महापौर उपमहापौर विजयी होतील, असा दावा समाजवादी पार्टीचे प्रदेश युवा सचिव-नगरसेवक मुस्तकीम डिग्रेटी यांनी पत्रकारांशी बोलतांना केला. महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौरपदासाठी येत्या ७ फेब्रुवारीस सकाळी ११ वाजता मनपा सभागृहात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Aayush Prasad) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा होत आहे. इस्लाम पार्टीतर्फे शेख नसरीनबानो खालीद हाजी यांनी महापौरपदासाठी दोन तर उपमहापौरपदासाठी शानेहिंद निहाल अहमद यांनी देखील दोन नामांकन अर्ज दाखल केले आहेत. इस्लाम पार्टीतर्फे माजी महापौर ताहेरा शेख रशीद यांनी महापौर पदासाठी तर उपमहापौरपदासाठी मो. मुस्तकीम मो. मुस्तफा यांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे.
शिवसेनेतर्फे (Shivsena) महापौरपदासाठी नगरसेविका लता सखाराम घोडके यांनी दोन नामांकन अर्ज दाखल केले तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे नगरसेवक नरेंद्र सोनवणे, अॅड. निलेश काकडे यांनी प्रत्येकी दोन असे चार नामांकन अर्ज दाखल केले. शिवसेनेपाठोपाठ एमआयएमतर्फे आमदार मौलाना मुफ्ती यांचे पूत्र नगरसेवक हाफिज अब्दुल्ला यांनी देखील उपमहापौरपदासाठी नामांकन अर्ज नगरसचिवांकडे दाखल केला. शिवसेना-एमआयएमतर्फे या निवडणुकी संदर्भात कालपर्यंत मौन बाळगण्यात आल्याने महापौर उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होईल, अशी चिन्हे दिसत होती. मात्र अचानक नाट्यमयरित्या शिवसेना व एमआयएमतर्फे महापौर-उपमहापौर पदासाठी नामांकन अर्ज मुदतीच्या आधीच अर्ज दाखल केले गेले. नामांकन अर्ज दाखल करण्यास सेना गटनेते निलेश आहेर यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. यावेळी निवडणुकीत बहुमतासाठी आवश्यक असलेल्या संख्या बळाबद्दल पत्रकारांनी विचारणा केली असता पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार नामांकन अर्ज दाखल करण्यात आले असल्याचे स्पष्ट करत आहेर यांनी संख्या बळाबद्दल बोलण्यास नकार दिला. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना-एमआयएम चमत्कार घडविणार असल्याच्या चर्चा शहरात सुरु आहेत.
कोण-कुणाबरोबर याकडे शहराचे लक्ष : डिग्रेटी
इस्लाम-समाजवादी पार्टी सेक्युलर फ्रंटकडे बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ आहे. त्यामुळे महापौरपदासाठी इस्लामच्या नसरीनबानो व उपमहापौरपदी समाजवादीच्या शानेहिद या उमेदवार राहणार आहेत. ही निवडणूक विचारधारेची असल्याने कोण-कुणाबरोबर राहणार आहे याकडे संपूर्ण शहराचे लक्ष असल्याचे समाजवादी नेते मुस्तकीम डिग्रेटी यांनी सांगितले. महापौर पदासाठी शिवसेनेने तर उपमहापौर पदासाठी एमआयएमने अर्ज दाखल केले आहेत. मात्र सेक्युलर फ्रंटला जनाधार मिळाला आहे. त्यामुळे एमआयएमने सोबत यायला हवे. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी देखील एमआयएम जातीयवाद्यांबरोबर राहणार नाही हे स्पष्ट केले होते. त्यामुळे या निवडणुकीत काय निर्णय घ्यायचा हे एमआयएम ठरवेल, अशी माहिती देत डिग्रेटी पुढे म्हणाले, एमआयएमचे धोरण शिवसेना-भाजप विरोधी आहे तसेच धोरण सेना-भाजपचे आहे. त्यामुळे एमआयएम शिवसेनेबरोबर राहिल कां हे आगामी काळात दिसून येत शहराच्या पूर्व-पश्चिम भागाचे राजकारण कोणत्या दिशेने आहे हे निवडणुकीत स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप तटस्थ राहणार
भाजप हिंदुत्ववादी विचारधारेचा पक्ष आहे. त्यामुळे महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत एमआयएमबरोबर जाण्याचा प्रश्न येत नाही, त्यामुळे भाजपचे दोन्ही नगरसेवक निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याची माहिती नगरसेवक मदन गायकवाड यांनी दै. ‘देशदूत’शी बोलतांना दिली, उपमहापौरपदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र ती आपण नाकारली आहे. काँग्रेसबरोबरचा गट देखील संपुष्टात आला आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणुकीत तटस्थ राहण्याचा आदेश दिला असून त्याचे पालन भाजपचे दोन्ही नगरसेवक करतील, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.





