पिंपळगाव बसवंत | प्रतिनिधी | Pimpalgaon Baswant
नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी (Nagar Parishad Election) उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी चार तर नगरसेवकपदासाठी ४५ अर्ज दाखल झाले. नगराध्यक्षपदासाठी एकूण १४ तर नगरसेवकपदासाठी एकूण १७७ उमेदवारांनी अर्ज सादर केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे व मुख्याधिकारी डॉ. श्रिया देवचके यांनी दिली.
पहिले तीन दिवस एकही अर्ज दाखल झाला नाही. गुरुवारी नगराध्यक्षपदासाठी चार तर नगरसेवकपदासाठी (Corporator) ३७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अपेक्षेप्रमाणे रविवारी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली.सोमवारी (दि.१७) अखेरचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले.
पहिल्या ऐतिहासिक नगरपरिषद निवडणुकीत भाजप-शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रीय काँग्रेस अशा तीन पॅनलमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत कित्येक युवा कार्यकर्ते उतरले आहेत. नशीब प्रयत्न आजमावण्याचा ते करत आहेत. नगरपरिषदेची ही निवडणूक विविध अंगाने रंगणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातच खरी लढत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय काँग्रेस एन्ट्री करण्याची शक्यता अधिक दृढ झाल्याने निवडणुकीला (Election) अधिक रंगत येणार आहे.




