येवला | प्रतिनिधी | Yeola
येवला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Yeola Nagar Parishad Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगरपरिषद कार्यालय परिसरात सकाळ पासूनच गर्दी झाली होती. परिसरात इच्छुक उमेदवार, त्यांचे समर्थक आणि पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या गर्दीने अक्षरशः जत्रेचे स्वरूप आले होते. सोमवारी, (दि. १७) नगराध्यक्षपदासाठी १२ अर्ज, तर नगरसेवक पदासाठी १५६ अर्ज असे एकूण १६८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत नगराध्यक्षपदासाठी एकूण १८ तर नगरसेवकपदाच्या २६ जागांसाठी एकूण २२८ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
येवला नगरपालिका निवडणुकीसाठी माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पार्टी, भाजप व महायुती घटक पक्षांच्या युतीची घोषणा करण्यात आली. तसेच महायुतीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पार्टीचे उमेदवार उपमहाराष्ट्र केसरी राजेंद्र लोणारी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, भाजपचे जेष्ठ नेते लक्ष्मण सावजी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.
दुसरीकडे, शिक्षक आमदार किशोर दराडे (Kishor Darade) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) प्रदेश सरचिटणीस डॉ. माणिकराव शिंदे यांनी संयुक्तपणे माध्यमांशी बोलताना, विकासासाठी आघाडी केल्याचे सांगत आघाडीच्या वतीने रूपेश दराडे (शिंदेसेना) यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी आमदार नरेंद्र दराडे, माजी नगराध्यक्ष रामदास दराडे, शिंदेसेना शहरप्रमुख अतुल घटे, रिजवान शेख आदी उपस्थित होते.
दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी (Town President) आनंद शिंदे, संकेत शिंदे, शाहिद अन्सारी (अपक्ष), मनोज दिवटे (भाजप), सुषमा परदेशी (भाजप, अपक्ष) यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नगरपालिका निवडणुकीसाठी युती आघाडीची घोषणा झाली असली तरी अद्याप जागावाटपाचा घोळ सुरूच आहे.
नगराध्यक्षासह बहुमताने महायुतीचा विजय होईल – भुजबळ
देशात आणि राज्यात महायुतीचे सरकार असून नगरपालिका निवडणुका ही महायुती घटक पक्ष एकत्र येऊन लढवत आहे. त्यानुसार चर्चा करून येवला नगरपालिका निवडणूकीत महायुतीघटक पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवत आहे. महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राजेंद्र लोणारी यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. येवला नगरपालिकेत नगराध्यक्षासह सर्वच उमेदवार विजय होऊन महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केला.




