नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या निवडणुका (Nagar Parishad Election) रंगतदार बनू लागल्या असून, शनिवारी उमेदवार व समर्थकांची प्रचंड गर्दी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रशासन कार्यालयांवर (Candidate) उसळली. एकाच दिवशी नगराध्यक्षपदासाठी तब्बल १८ इच्छुकांकडून २८ अर्ज, तर सदस्यपदांसाठी ३२४ उमेदवारांकडून ४२५ अर्ज दाखल झाल्याचे चित्र आहे.
नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवारी (दि. १७) आहे. शनिवारी अर्ज स्वीकारण्यास प्रशासनाने परवानगी दिली होती. रविवारी सुट्टी असल्याने शनिवारीच मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली. मात्र अर्ज दाखल प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आल्याने प्रशासनाने रविवारीही अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रविवारीही (दि. १६) मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
तांत्रिक अडचणींनी उमेदवार हैराण
अर्ज दाखल करताना अनेक उमेदवारांना तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला. अर्जाच्या प्रती काढणे, त्यांचे ऑनलाईन अपलोड करणे, दस्तऐवज स्कॅन करणे या प्रक्रियांमध्ये विलंब होत असल्याने उमेदवारांच्या तक्रारी वाढल्या. विशेषतः ग्रामीण भागातील अनेक उमेदवार आधुनिक तंत्रज्ञानाशी अपरिचित असल्यामुळे त्यांना अर्ज सादर करताना मोठी अडचण निर्माण झाली. यामुळेच प्रशासनाने रविवारीही अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून कोणताही उमेदवार प्रक्रियेतून वंचित राहू नये.
| नगरपरिषद | नगराध्यक्ष | सदस्य |
| इगतपुरी | ० | ०१ |
| नांदगाव | ०१ | १२ |
| भगूर | ०१ | २३ |
| ओझर | ० | २८ |
| त्र्यंबकेश्वर | ०८ | ८० |
| पिंपळगाव बसवंत | ०४ | ३७ |
| मनमाड | ० | १४ |
| येवला | २ | १७ |
| सिन्नर | ४ | ६४ |
| सटाणा | ५ | ६६ |
| चांदवड | ३ | ४५ |
| एकूण | २८ | ४२५ |




