Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Politics : माघारीनंतर जिल्ह्यातील लढतींचे चित्र स्पष्ट; अकरा नगराध्यक्षपदांसाठी ६१ उमेदवार...

Nashik Politics : माघारीनंतर जिल्ह्यातील लढतींचे चित्र स्पष्ट; अकरा नगराध्यक्षपदांसाठी ६१ उमेदवार रिंगणात

नगरसेवकांच्या २६६ जागांसाठी १ हजार २८ उमेदवार मैदानात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदांसाठी (Nagarparishad Election) उमेदवारी अर्ज माघारीनंतर शुक्रवारी (दि.२१) निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. यामध्ये येवला, भगूर व नांदगाव मध्ये सरळ लढत होणार असून सटाणा व पिंपळगाव बसवंत येथे तिरंगी तर इगतपुरी (Igatpuri) येथे चौरंगी लढत होणार आहे. इतर ठिकाणी मात्र बहुरंगी लढतींचा सामना बघायला मिळणार आहे. अकरा नगरपरिषदांच्या ११ नगराध्यक्षपदांसाठी ६१ उमेदवार रिंगणात आहेत. तर नगरसेवकांच्या २६६ जागांसाठी १ हजार २८ उमेदवार मैदानात आहे.

- Advertisement -

या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी होत असलेल्या निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडीतील सहाही पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांना भिडणार असल्याने ही निवडणूक रंगतदार अवस्थेत आली आहे. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपने सटाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पिंपळगाव बसवंत, ओझर, चांदवड, सिन्नर आणि नांदगाव येथे आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाने सटाणा, त्र्यंबकेश्वर, येवला, इगतपुरी, मनमाड, भगूर, ओझर, सिन्नर या ठिकाणी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

YouTube video player

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP Ajit Pawar) गटानेही आठ उमेदवारांना उमेदवारी दिली असून यामध्ये येवला, त्र्यंबकेश्वर, नांदगाव, भगूर, पिंपळगाव बसवंत, ओझर, चांदवड आणि सिन्नरचा समावेश आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पाच नगराध्यक्ष पदाच्या जागांवर लढत असून त्यामध्ये इगतपुरी, मनमाड, ओझर, चांदवड, सिन्नरचा समावेश आहे. राष्ट्रीय पक्ष व एकेकाळी संपूर्ण जिल्ह्यावर वर्चस्व असलेल्या काँग्रेसने मात्र तीनच ठिकाणी आपले उमेदवार रिंगणात उतरविले असून, यामध्ये राखीव असलेल्या पिंपळगाव बसवंत व ओझर या ठिकाणी तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये आपला उमेदवार रिंगणात उतरविला आहे. वंचित बहुजन आघाडीनेही इगतपुरी येथे आपला उमेदवार दिला असून अपक्षही या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत.

सिन्नर (Sinnar) नगराध्यक्षपद खुले असून येथील लढत ही मंत्री माणिकराव कोकाटे, शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे आणि नुकतेच भाजपत दाखल झालेले उदय सांगळे यांच्या नेतृत्वाखाली ही होत असल्याने याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे. येथे नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवार रिंगणात असून यामध्ये हेमंत वाजे (भाजप), प्रमोद चोथवे (शिवसेना उबाठा पक्ष), नामदेव लोंढे (शिवसेना) विठ्ठल उगले (राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्यामध्ये चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. सटाणा नगरपरिषदेमध्ये तिरंगी लढत होत असून यामध्ये शिवसेनेच्या हर्षदा पाटील व भाजपच्या योगिता मोरे या एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या असून रूपाली कोठावदे या अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत.

येवला (Yeola) येथे मंत्री छगन भुजबळ आणि आजी माजी आमदार दराडे बंधू यांच्यातच लढत रंगणार असून शिवसेनेकडून रुपेश लक्ष्मण दराडे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र लोणारी एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये चौरंगी लढत होणार असून या ठिकाणी अपक्षांसह आठ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये सुरेश गंगापुत्र (राष्ट्रवादी काँग्रेस), कैलास घुले (भाजप), त्रिवेणी तुंगार (शिवसेना) आणि दिलीप पवार (काँग्रेस) यांच्यामध्ये सामना रंगणार आहे.

इगतपुरीमध्येही (Igapturi) चौरंगी लढत रंगणार असून या ठिकाणी शालिनी खताळ (शिवसेना), मधुमती बेंद्रे (भाजप), शुभांगी दळवी (शिवसेना उबाठा पक्ष), अपर्णा धात्रक (बंचित बहुजन आघाडी) यांच्यात लढत रंगणार आहे. भगूरमध्ये ही दुरंगी लढत होणार असून महिलांसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते विजय करंजकर यांची पत्नी अनिता करंजकर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी एकमेकांसमोर आव्हान उभे केले आहे. पिंपळगाव बसवंत नगराध्यक्षपद राखीव असून, या ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. यामध्ये गोपाळकृष्ण गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस), डॉ. मनोज बडे (भाजप) आणि संतोष गांगुर्डे (काँग्रेस) असा तिरंगी सामना होणार आहे. ओझरचे नगराध्यक्षपदही राखीव असून देखील या ठिकाणी दहा उमेदबार नगराध्यक्ष पदासाठी आपले नशीब आजमावत आहेत.

दरम्यान, महिलांसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी अनिता घेगडमल (भाजप), प्रज्ञा जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस), जयश्री जाधव (शिवसेना उबाठा पक्ष), श्वेता अहिरे (शिवसेना) आणि मालती बंधरे (काँग्रेस) यांच्यामध्ये पंचरंगी सामना पाहायला मिळणार आहे. चांदवड येथेही नगराध्यक्ष पदासाठी तब्बल ११ उमेदवार रिंगणात असून सर्वाधिक उमेदवारांची संख्या चांदवड मध्येच पाहायला मिळत आहे. येथे वैभव बागुल (भाजप), विकी जाधव, (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), शंभूराजे खैरे (शिवसेना उबाठा पक्ष), सुनील बागुल (राष्ट्रवादी काँग्रेस) या चौघांमध्ये लढत होणार असून, येथे अपक्षांनी देखील उमेदवारी ठेवल्याने ही लढत रंगतदार ठरणार आहे.

मनमाड, नांदगावमध्ये चुरस

मनमाड नगरपरिषदेमध्ये हाय होल्टेज ड्रामा अखेरपर्यंत रंगला. या ठिकाणी शिवसेना उबाठा पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेले नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून तसेच अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणारे माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांनी माघार घेतली आहे. आमदार सुहास कांदे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे आता येथे शिवसेना भाजप आरपीआय युतीतर्फे शिवसेनेचे योगेश पाटील यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवीण नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र घोडेस्वार यांच्यात तिरंगी लढत होणार. असे चित्र असले तरी येथे अपक्षांसह एकूण नऊ उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक रंजक ठरणार आहे. नांदगावमध्ये सरळ लढत होणार असून या ठिकाणी शिवसेनेचे सागर हिरे हे भाजपच्या पाठिंब्यावर उमेदवारी करत असून, त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश बनकर हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर लढत देत आहे. या ठिकाणी दुरंगी लढतीचा सामना नांदगावकरांना बघायला मिळणार आहे. नांदगाव व मनमाड नगरपरिषदेची निवडणूक आमदार सुहास कांदे विरुद्ध माजी खासदार समीर भुजबळ यांच्यातच रंगणार असल्याचे चित्र आहे.

उमेदवार संख्या

नगरपरिषदनगराध्यक्षनगरसेवक
इगतपुरी ०४ ७०
त्र्यंबकेश्वर ०८ ५४
नांदगाव ०२ ४७
भगूर ०२ ५१
ओझर १० ११७
पिंपळगाव बसवंत ०३ ६९
मनमाड ०९ २१५
येवला ०२ ८९
सिन्नर ०७ १२८
सटाणा ०३ ७४
चांदवड ११ ११४
एकूण ६११०२८

ताज्या बातम्या

सोनिया

काँग्रेस खासदार सोनिया गांधींची तब्येत अचानक बिघडली; रुग्णालयात दाखल

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiकाँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी त्यांची...