नाशिक | Nashik
महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Corporation Election) आज (दि.१५) रोजी शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. काही ठिकाणी सकाळच्या सुमारास ईव्हिएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदारांचा गोंधळ उडाला होता. त्यामुळे काही काळ मतदान थांबल्याने मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, आता नाशिकच्या सिडकोमध्ये मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्रभाग क्रमांक २९ मधील ‘अ’ गटातील अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी भाजप उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या सावतानगर येथील कार्यालयाबाहेर पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, एसीपी सचिन बारी आणि अंबड पोलीस ठाण्याचे पीआय जगवेंद्रसिंह राजपूत घटनास्थळी दाखल झाले आहेत.
हे देखील वाचा : Nashik Municipal Election : नाशिकमध्ये सकाळपासून मतदानास सुरुवात; ‘या’ प्रभागांत EVM मध्ये बिघाड झाल्याने उडाला होता गोंधळ
नाशिक शहरात सकाळी साडे सात ते साडे नऊ या पहिल्या दोन तासांत ६.५० टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली होती. तसेच दुपारनंतर हा मतदानाचा आकडा वाढण्याची शक्यता असून, मतदारांची मतदान केंद्रांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही मतदार सकाळच्या सत्रात मतदान करण्यास प्राधान्य देत असल्याचे बघायला मिळत आहेत.
दरम्यान, नाशिक महापालिकेच्या एकूण १२२ जागांसाठी ७३५ उमेदवार (Candidate) रिंगणात असून, त्यामध्ये ५२७ राजकीय पक्षांचे व २०८ अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये अटीतटीच्या लढती होणार आहेत. या निवडणुकीत एकूण १३ लाख ६० हजार ७२२ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात ६ लाख ५६ हजार ६७५ महिला आणि ७ लाख ३ हजार ९६८ पुरुष मतदारांचा समावेश आहे. तर तृतीयपंथी ७९ मतदार आहेत.
हे देखील वाचा : Nashik Municipal Election : नाशिकमध्ये पहिल्या दोन तासांत ‘इतके’ टक्के मतदान; दुपारनंतर मतदारांची गर्दी वाढण्याची शक्यता
काही प्रभागांत ईव्हीएममध्ये बिघाड
प्रभाग क्रमांक ०२ मधील आडगावच्या महापालिका शाळेतील खोली क्रमांक ९ मधील ईव्हीएम नऊ वाजेपर्यंत बंद होते. त्यामुळे मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीन बदलल्याने मतदानास सुरुवात झाली. तर २४ मधील मॉडर्न हायस्कूल, खोली क्रमांक ८ येथे ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने या मतदान केंद्रावर सकाळी बराच वेळ मतदान सुरू होऊ शकले नाही. तांत्रिक अडचण आल्यामुळे मतदान प्रक्रियेला उशीर झाला. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी तांत्रिक बिघाड तातडीने दूर करून केल्याने संबंधित मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. तर प्रभाग क्रमांक २९ मधील एका मतदान केंद्रातील खोली क्रमांक दोनमध्ये ईव्हीएम मशीन अचानक बंद पडले. त्यामुळे तब्बल अर्धा तास मतदान प्रक्रिया पूर्णपणे ठप्प होती. यानंतर मशीन सुरू झाल्याने मतदान प्रक्रिया सुरु झाली.




