नाशिक | Nashik
महापालिका निवडणुकीसाठी (Nashik NMC Election) आजपासून (मंगळवार) सुरुवात झाली असून, शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापल्याचे बघायला मिळत आहे. सत्ता आणि संधींच्या गणितात माजी नगरसेवकांना भाजप सुरक्षित पर्याय असल्याची भावना राजकीय कार्यकर्त्यांमध्ये बळावत आहे. त्यामुळे अनकेजण आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. अशातच आता शहरात काँग्रेसला (Congress) मोठा धक्क्का बसला असून, माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
हे देखील वाचा : Nashik Politics : नाशिकमध्ये लवकरच राजकीय भूकंप! अनेक बडे नेते भाजपच्या वाटेवर; पक्षप्रवेशाची तारीख ठरल्याची चर्चा
माजी नगरसेवक राहुल दिवे (Rahul Dive) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पत्र लिहिले असून, त्यामध्ये “मी, राहुल अशोक दिवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव या नात्याने काँग्रेस पक्षा मध्ये कार्यरत आहे. गेल्या काही काळापासून मला या पदाच्या माध्यमातून पक्षाची सेवा करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी आपला/पक्षाचा आभारी आहे. परंतु, माझ्या काही अपरिहार्य वैयक्तिक कारणांमुळे, मला यापुढे पक्षाचे काम सुरू ठेवणे शक्य नाहीये. तरी, मी आज दिनांक 22/12/2025 रोजी माझ्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. कृपया तो स्वीकारण्यात यावा, ही विनंती”. असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, सध्या आपापल्या पक्षांमध्ये तिकीटवाटपाची जबाबदारी सांभाळणारे विरोधी पक्षांतील अनेक वरिष्ठ नेते भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याच्या चर्चामुळे संबंधित पक्षांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली आहे. जर हे नेते पक्ष सोडून गेले तर उर्वरित कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची होण्याची आणि पक्षसंघटनांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता माजी नगरसेवक राहुल दिवे यांनीही काँग्रेसचा ‘हात’ सोडल्याने ते कुठल्या पक्षात प्रवेश करतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.





