सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar
भाजपा (BJP) हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची पक्षात कदर होते. उदय सांगळे (Uday Sangle) यांच्या रूपाने पक्षाला तालुक्यात चांगला कार्यकर्ता गवसला आहे. तुम्ही सर्व प्रामाणिकपणे काम करा. जमिनीशी जोडून राहिल्यास कोणीही तुम्हाला पराभूत करू शकणार नाही. त्यांच्यासोबत तोलामोलाची माणसं पक्षात आली आहेत. त्यामुळे आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत एकहाती सत्ता आणून संपूर्ण तालुक्यात कमळ फुलवा, असे आवाहन सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले. उदय सांगळे यांच्यासह त्यांच्या समर्थकांच्या भाजपा प्रवेश सोहळ्यात ते बोलत होते.
व्यासपीठावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महामंत्री विजय चौधरी, अजित चव्हाण, लक्ष्मण सावजी, माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शितल सांगळे, माजी आमदार बाळासाहेब सानप, अपूर्व हिरे, आमदार मंगेश चव्हाण, विठ्ठल जपे, रवी अनासपुरे, लक्ष्मण सावजी, विजय साने, विवेक कोल्हे, बंडूनाना भाबड, भाऊसाहेब शिंदे, सजन सांगळे, किरण लहाने, बाळासाहेब हांडे, अॅड. शिवराज नवले यांच्यासह जिल्हा व तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी सांगळे म्हणाले, भाजपा हा कार्यकर्त्यांचा (Worker) पक्ष आहे. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची पक्षात कदर होते. जो काम करेल तो अगदी दहा वेळा निवडून येईल. काम करणाऱ्या माणसालाच पक्षात किंमत मिळते. प्रामाणिकपणे काम करा, जमिनीशी जोडून रहा. उदय यांच्यामध्ये तो गुण दिसतोय. त्यांच्याबरोबर तोलामोलाची माणसं पक्षात आली आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये तालुक्यात कमळ फुलवण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन ना. महाजन यांनी केले. विकासाचे व्हिजन असणारा उदयसारखा नेता भाजपाला तालुक्यात लाभला असून, 2029 च्या तयारीसाठी त्यांच्यासोबत राहण्याचा शब्द प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी दिला. आपल्याला कुठलाही राजकीय वारसा नसताना आपण चळवळीतून पुढे आलो असल्याचे उदय सांगळे म्हणाले. विद्यार्थी, युवक चळवळ, त्यानंतर पंचायत समिती, पत्नीचे जिल्हा परिषद अध्यक्षपद या माध्यमातून गेली 21 वर्षे समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहे. राजकीय परिस्थितीमुळे विधानसभेच्या वेळी पक्षांतर करावे लागले, असे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, तालुक्याला (Taluka) पक्षांतर नवीन नाही. तालुक्यातील सर्वच नेत्यांनी आजपर्यंत अनेकदा पक्षांतर केले आहे. त्यामुळे कोणीही निष्ठेच्या गप्पा मारु शकत नाही, असा टोला त्यांनी मारला. विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील दोन्ही नेत्यांनी निरा कुस्ती केली, तरी पंधरा दिवसांत निवडणुकीची तयारी करून सर्वसामान्य माणसांच्या जीवावर एक लाख मतांपर्यंत पोहोचलो. निवडणूक हरलो, तरी मनाने हरलो नसल्याचे ते म्हणाले. स्व. सूर्यभान गडाख व स्व. तुकाराम दिघोळे यांनीच तालुक्यात शाश्वत विकास केला. सहकारी औद्योगिक वसाहत, शासकीय वसाहतीसह कडवाचे पाणी 86 कि.मी.च्या कॅनॉलने तालुक्याच्या पूर्व भागात पोहोचले. त्यामुळे तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास झाला. तालुक्याची बाजारपेठ फुलण्यामागे हे दोन्ही नेते होते. त्या उलट, गेल्या 30 वर्षांत असे एकतरी काम दाखवा, असे आव्हान सांगळे यांनी दिले.
तसेच राज्याचे क्रीडामंत्री, खासदार असे तालुक्यात दोन-दोन सत्ताकेंद्र असताना दिवाळीसारख्या सणाच्या काळात शहरात 15-15 दिवस प्यायला पाणी मिळत नाही. शंभर कोटींची पाणीपुरवठा योजना असूनही अशी वेळ यावी? उपनगरांमध्ये रस्ते नाहीत, सांडपाण्याची व्यवस्था नाही. मुसळगावच्या इंडिया बुल्सची 5 हजार एकर जमीन पडून आहे. तिथे एकही नवा उद्योग यायला तयार नाही. भाजपात जाऊन आपल्याला स्वतःसाठी काही मिळवायचे नाही, तर तालुक्यातील लोकांसाठी मागायचे आहे. नदीजोड प्रकल्प झाला तर तालुका समृद्ध होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. शितल अध्यक्ष असताना जिल्हा परिषदेच्या कार्यालयाची पायाभरणी केली होती. त्याचे उद्घाटन लवकरच मुख्यमंत्री करणार आहेत. आपली पुढची लढाई तालुक्याच्या विकासासाठीच राहणार असून, पक्षाच्या उमेदवारांंच्या मागे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. आता लवकरच निवडणुका लागणार असून, पुढच्या आठवड्यात अजून अनेकांचे भाजपा प्रवेश होणार आहेत. त्यासाठी पुन्हा यावे लागेल, असे निमंत्रणच उदय सांगळे यांनी गिरीश महाजन यांना दिले. यावेळी तालु्नयातील हजारो सांगळे समर्थक व भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते
मी खेळाडू,पण….
तसा मी खेळाडू पण, तुम्ही समजता तसा जंगली रमीचा खेळाडू नाही, असा टोला सांगळे यांनी ना. माणिकराव कोकाटे यांचे नाव न घेता लगावला. तेव्हा व्यासपीठासह समोर बसलेल्या सर्वांमध्येच हशा पिकला. मी कुस्ती खेळायचो, कबड्डी खेळायचो. आताही दरवर्षी कबड्डीच्या स्पर्धा घेतो. फेब्रुवारीमध्ये राज्य कबड्डी असोसिएशनच्या राज्य स्पर्धा घेण्याचा मान सिन्नर तालुक्याला मिळाला असल्याचे त्यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. तालुक्यातील 55 पहिलवान आपल्याकडे राहतात. तालु्नयातल्या अनेक खेळाडूंना राजाश्रय देण्याचे काम करत असल्याचे ते म्हणाले.
भाऊ, तुम्ही साहेब बनू नका
राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत त्यांच्या लहान भावाच्या भुमिकेतच 27 वर्ष राहीलो. कार्यकर्त्याच्या भुमिकेत त्यांच्यासाठी झपाट्याने काम करत आलो. मात्र, मध्यंतरी काही कारणाने त्यांच्यापासून दूर व्हावे लागले. आताही बोलण्यापेक्षा करुनच दाखवू. सोमठाणे गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचेही भारत कोकाटे यांनी बोलून दाखवले. यापूर्वीही मोठ्या भावासोबतच होतो. आताही महाजन यांच्या माध्यमातून मोठ्या भावासोबतच राहणार आहे. मात्र, तुम्ही भाऊ म्हणूनच रहा. साहेब बनू नका. भाऊ साहेब झाले की वेगळा अनुभव येतो असा टोला त्यांनी मारला.
यांनीही केला प्रवेश
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अॅड. संजय सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य स्वप्नाली सोनवणे, उबाठा शिवसेनेच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सुनिता संजय सानप, त्यांचे पती संजय सानप, शिवसेना उबाठा गटाचे पंचायत समितीचे माजी उपसभापती संग्राम कातकाडे, जगन्नाथ भाबड, ना. कोकाटे समर्थक पंचायत समितीचे माजी सदस्य रामदास ठोक, दिपक बर्के, बाजार समितीचे संचालक नवनाथ घुगे, खरेदी विक्री संघाचे संचालक लहानू भाबड, कुणाल खुळे, सचीन देशमुख, पंचायत समितीच्या माजी उपसभापती रोहीणी कांगणे यांच्यासह तालु्नयातील शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी यावेळी भाजपात प्रवेश केला.
निवडणूक स्वबळावर
उदय सांगळे यांच्या प्रवेशामुळे भाजपाला तालु्नयात नावारुपाला येण्याची चांगली संधी आली आहे. यापूढे तालु्नयात त्यांच्या खांद्याला खांदा लावून पक्षाचे काम करु असे जयंत आव्हाड म्हणाले. येणाऱ्या निवडणूकीत आम्ही कुणाशीही युती करणार नाही. स्वबळावर लढणार असा नारा त्यांनी दिला तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करुन त्यांच्या म्हणण्याला पाठींबा दिला.





