नाशिक | Nashik
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने त्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे. आपल्याला मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळ यांनी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जबाबदार धरत त्यांच्यावर नाशिकमध्ये घेतलेल्या समता परिषदेच्या मेळाव्यातून टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर काल भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या दोघांमध्ये तब्बल ४० मिनिटे चर्चा झाली. त्या भेटीवरून राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आणि नाशिक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोरख बोडके यांनी पत्रकार परिषद घेत कृषीमंत्री कोकाटेंवर पलटवार केला आहे.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “मंत्री माणिकराव कोकाटे (Minister Manikrao Kokate) हे पाच वर्षांपूर्वी पक्षात आले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) पराभव झाल्यानंतर छगन भुजबळ यांनीच कोकाटे यांचा पक्षात प्रवेश करून घेतला होता. कोकाटे स्वतः जातीयवादी आहेत त्यांनी भुजबळांवर बोलू नये. भुजबळ हे पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादीत असून माणिकराव कोकटे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असे सर्व पक्ष फिरून आले आहेत. त्यामुळे त्यांनी भुजबळांवर बोलू नये”, अशी खरमरीत टीका करत गोरख बोडके (Gorkh Bodke) यांनी कोकाटे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
ते पुढे म्हणाले की, “छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष पदापर्यंत पोहोचवले आहे, त्यामुळे भुजबळ हे जातीयवाद करत नाहीत. मात्र, कोकाटे यांना कृषीमंत्री पद मिळताच त्यांनी छगन भुजबळांवर टीका करायला सुरुवात केली. याचा आम्ही प्रखरपणे विरोध करत असून कोकाटेच जातीयवाद करत आहेत”, असे गोरख बोडके यांनी म्हटले.
माणिकराव कोकाटे नेमकं काय म्हणाले होते?
भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्यानंतर कोकाटे म्हणाले होते की,”छगन भुजबळ यांच्या दृष्टीने त्यांचे कुटुंब हेच एकमेव ओबीसी आहेत. विशेष म्हणजे स्वतः भुजबळ आणि त्यांचा पुतण्या हेच केवळ ओबीसी आहेत, अशा अविर्भावात त्यांची वर्तणूक सुरू आहे. अन्य कोणी ओबीसी त्यांना दिसतच नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजवर छगन भुजबळ यांना न्याय दिला आहे. त्यांना जी संधी दिली आहे, तशी आजवर कोणालाही दिलेली नाही. त्यामुळे भुजबळ यांनी योग्य बोध घेतला तर ते चांगले होईल.
ग्रामीण भागात गावागावांत मराठा आणि ओबीसींसह सर्व समाज एकत्र वावरतात. त्यांच्यातील संबंध अतिशय चांगले आहेत. ते सगळे एकत्रितपणे काम करतात. त्यांचा एकमेकांवर विश्वास आहे. यामध्ये तेढ निर्माण करणे आणि समाजा समाजात फूट पाडणे हे राजकारण मला पटणारे नाही.राज्य सरकारमध्ये सध्या ४२ मंत्री आहेत यातील १७ मंत्री ओबीसी तर १६ मंत्री मराठा समाजाचे आहेत. अशा स्थितीत ओबीसी समाजाला सर्वाधिक न्याय देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यांनी घेतलेली भूमिका स्वागत करावे अशी आहे. असे असतानाही भुजबळ मात्र ओबीसींवर अन्याय झाला असे सांगतात हे ढोंग मला अजिबात मान्य नाही. भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्याने पक्षाकडून कोणतीही चूक झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.