पिंपळगाव बसवंत | लक्ष्मण महाडिक | Pimpalgaon Baswant
सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) स्पष्टतेमुळे पिंपळगाव बसवंतसह राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी निर्धोकपणे पार पडणार आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या मनात असलेली धाकधूक थांबली आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डॉ. मनोज बर्डे, इंजि. गोपालकृष्ण (शरद)) गायकवाड आणि संतोष गांगुर्डे यांच्यात तिहेरी लढत रंगणार असून, शहराचा पहिला नगराध्यक्ष कोण होणार, याकडे लक्ष लागले आहे.
निकालानंतर पिंपळगाव बसवंतमध्ये भाजप व शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रचार कार्याला गती दिली. संध्याकाळपर्यंत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी व उमेदवारांनी शहराच्या उर्वरित भागात प्रचाराचे फलक लावले. त्याचप्रमाणे डिजिटल व फिरत्या प्रचार यंत्रणेला अधिक गती दिली. नगरपरिषदेच्या बारा वॉर्डमधून २५ नगरसेवक व एक नगराध्यक्ष निवडून दिला जाणार आहे. काँग्रेसने नगराध्यक्ष व इतर काही प्रभागात उमेदवार उभे करून दोन्ही बलाढ्य पॅनलसमोर आव्हान उभे केले आहे.
नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती पुरुष वर्गासाठी राखीव निघाल्याने आदिवासी बांधवांमध्ये चैतन्य निर्माण झाले. भाजपचे उमेदवार डॉ. मनोज बर्डे उच्चविद्याविभूषित (एम. डी) आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची उमेदवारी इंजि. गोपालकृष्ण तथा शरद गायकवाड करत आहेत. गायकवाड राज्य शासनाच्या बांधकाम विभागातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहेत. तेही उच्च विद्याविभूषित आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय काँग्रेसचे संतोष गांगुर्डे हेही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे आहेत. डॉ. बर्डे आणि इंजि. गायकवाड हे नवखे उमेदवार आहेत तर गांगुर्डे यांनी यापूर्वी पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेत सदस्य म्हणून कामकाज पाहिले आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस उतरल्यामुळे मोठी रंगत आली आहे.
बड्या नेत्यांची टक्कर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व आ. दिलीप बनकर, तानाजी बनकर, भास्करराव बनकर, दिलीप मोरे व विश्वासराव मोरे करीत आहेत. भाजप व शिवसेना युतीचे नेतृत्व सतीश मोरे, बापू पाटील, राजेश पाटील, निलेश पाटील व किरण लभडे तर काँग्रेसचे नेतृत्व राजाराम पानगव्हाणे, दीपक बनकर, ज्ञानेश्वर चव्हाण, राजाभाऊ गांगुर्डे, बाळा बनकर व इतर करीत आहेत.




