इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) वतीने इगतपुरी (Igatpuri) येथे दि. १४ जुलै पासून मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत तीन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर सुरू आहे. या शिबीरात उध्दव ठाकरेंची शिवसेना व मनसे यांच्या युतीबद्दल राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचे (Maharashtra) लक्ष लागून राहिले होते. मात्र शिबीराच्या पहिल्याच दिवशी राज ठाकरे यांनी युती बद्दल बोलणे टाळले. युती बाबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळी निर्णय जाहीर करू असे त्यांनी सुतोवाच केले. तर आज (मंगळवार) दि. १५ रोजी शिबीराच्या दुसऱ्या दिवशी राज ठाकरे यांनी सकाळच्या सत्रात पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.
शिबीराच्या (Shibir) दुसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात राज ठाकरे यांनी पदाधिकारी यांच्याशी साधलेल्या चर्चेत बोलतांना सांगितले की उद्धव ठाकरे शिवसेना व मनसे युती बाबत माध्यमांशी कोणतीही चर्चा करू नये. या बाबत मी स्वताः लवकरच निर्णय घेईल मात्र तो पर्यंत या विषयी कोणीही विचारणा अथवा पुढाकार घेवुन स्टेटमेंट देऊ नये. आगामी येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे पदाधिकारी यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात बुथ निहाय परिक्षण करून निवडणुकीच्या तयारीला लागावे. मतदार याद्या पडताळणी करुन नव्याने मतदार यादीत (Voter List) समाविष्ठ झालेले नावे व दुबार नावांची चाचपणी करावी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी यांनी आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा असा सल्ला दिला.
त्यानंतर नेते व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून ३ वाजेच्या सुमारास राज ठाकरे व अमित ठाकरे (Amit Thackeray) मुंबईला रवाना झाले. मात्र, मुंबईकडे (Mumbai) जाण्यापूर्वी पत्रकारांनी राज ठाकरेंना युतीबाबत पुन्हा विचारले असता मी २० जुलैनंतर नाशिकचा दौरा करणार आहे. त्यावेळी पाहू असे सांगितले. तर संध्याकाळच्या सत्रात नेते व पदाधिकारी यांना बाळा नांदगावकर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच बुधवारी होणाऱ्या चर्चासत्रात संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर, प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकमार इचम, सलीम मामा शेख, सुदाम कोंबडे, मनोज चव्हाण यांच्यासह राज्यातील मुख्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.





