नांदगाव | प्रतिनिधी | Nandgaon
नांदगाव नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (Nandgaon Nagarparishad) अखेर शिवसेना (शिंदेगट) व भारतीय जनता पार्टीच्या युतीची घोषणा आमदार सुहास कांदे व भाजपा तालुकाध्यक्ष संजय सानप तथा व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी देवाज बंगला येथे पत्रकार परिषदेत केली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला मोठा झटका बसला आहे.
नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू असताना देखील महायुती आणि आघाडी यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची युती अथवा आघाडी झाल्याचे दिसून येत नव्हते. यामुळे इच्छुक उमेदवारांची (Candidate) घालमेल सुरू होती. मात्र शिवसेना पक्षाने नांदगाव नगरपरिषदेसाठी कोअर कमिटी स्थापना करून युती संदर्भात भाजपासोबत युतीची (Alliance) चर्चा सुरू होती.
याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, नाशिक जिल्हा प्रभारी आमदार सुहास कांदे यांच्या आदेशानुसार तसेच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत युती संदर्भात चर्चा होऊन आमदार राहुल आहेर, भाजपा जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांच्या समंतीने शिवसेना -भाजप युती करण्याचा निर्णय झाल्याची घोषणा आमदार कांदे व भाजपा तालुकाध्यक्ष संजय सानप, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड,राजींव धामणे, उमेश उगले, दिपक देसले, सचिन पांडे सतिश शिदे,रेखा शेलार आदींनी पत्रकार परिषदेत केली.
दरम्यान, यावेळी समृद्धी बँकेचे चेअरमन अंजुम कांदे, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, तालुकाध्यक्ष साईनाथ गिडगे, सुनील जाधव, अमोल नांवदर, विलास आहेर, रोहीणी मोरे, शरद उगले, तसेच शिवसेना-भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




