नाशिक | Nashik
गेल्या अनेक दिवसापासून नाशिकमध्ये ठाकरे गटाला (Thackeray Group) खिंडार पडताना दिसत आहे. माजी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विलास शिंदे यांच्यानंतर आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये (Nashik) ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. नुकतीच ठाकरे गटाच्या महानगरप्रमुखपदी नियुक्ती झालेले मामा राजवाडे (Mama Rajwade) यांच्यासह उपनेते सुनील बागुल आणि काही माजी नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशामुळे नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढणार आहे.
मामा राजवाडे यांच्यावर ठाकरे गटाने महानगरप्रमुखपदाची जबाबदारी सोपविल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी (Poliice) एका मारहाण प्रकरणात राजवाडे आणि सुनील बागुल (Sunil Bagul) यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. हे दोन्ही नेते त्याठिकाणी उपस्थितही नव्हते, असे सांगितले जाते. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला होता. त्यामुळे मामा राजवाडे आणि सुनील बागुल फरार झाले होते. यानंतर त्यांनी जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढलेले गणेश गीते (Ganesh Gite) हे देखील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तर ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका सीमा ताजणे, प्रशांत दिवे आणि माजी नगरसेवक कमलेश बोडके हे देखील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. याशिवाय शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल यांचे चिरंजीव शंभू बागुल, आणि युवा नेते अजय बागुल हे देखील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने या नेत्यांचा प्रवेश महत्वपूर्ण ठरणार असून, मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून या नेत्यांचा आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश होत असल्याचे बोलले जात आहे. या सगळ्यांच्या भाजपमधील पक्षप्रवेशाबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती. काल (बुधवारी) रात्री दीड वाजेपर्यंत याबाबत मुंबईत भाजपच्या गोटात गुप्त खलबतं सुरु होती. या बैठकीला गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि नाशिकमधील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.




