नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नगर पंचायत, नगर परिषद निवडणुकांच्या मतदानाआधी नाशिक
जिल्ह्यात (Nashik District) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. उपनेते अद्वय हिरे (Advay Hiray) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अद्वय हिरे आज दुपारी मुंबईतील भाजप कार्यालयात आपल्या समर्थकांसह पक्षप्रवेश करणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अद्वय हिरे हे भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. याआधी अद्वय हिरे भाजपातच होते. त्यांनी भाजपातून ठाकरे गटात प्रवेश केला होता. यानंतर हिरे यांनी 2024 मध्ये मालेगाव बाह्य मतदारसंघातून शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.मालेगावाच्या राजकारणात हिरे कुटुंबियांची ताकद आहे. आता अद्वय हिरे यांच्या पक्षप्रवेशाने भाजपच मजबूत होणार आहे.
दरम्यान, अद्वय हिरे यांच्याविरोधात चौकशीचा ससेमीरा लागला होता. ते त्या गोष्टीला सामोरे देखील गेले होते. पण गेल्या काही दिवसांपासून पुन्हा भाजपात घरवापसी करणार असल्याच्या चर्चा सातत्याने समोर येत होत्या. तरीही त्याबाबत कोणतीही अधिकृत अशी माहिती समोर येत नव्हती. पण आता अद्वय हिरे यांचा आज मुंबईत भाजपच्या कार्यालयात पक्षप्रवेश होणार आहे. अद्वय हिरे यांच्या पक्षप्रवेशामुळे मालेगावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठं आव्हान उभं राहणार आहे. अद्वय हिरे यांचा भाजप (BJP) प्रवेशामुळे दादा भुसे यांच्यासाठी आगामी निवडणूक ही प्रतिष्ठेची बनणार आहे.




