नांदगाव | प्रतिनिधी | Nandgaon
नांदगाव नगरपरिषदेची निवडणूक (Nandgaon Nagar Parishad Election) मोठ्या रंगतदार वळणावर असून, विविध पक्षाचे, गटाचे उमेदवार सक्रीय झाल्याने स्थानिक मुद्यावर चर्चा झाल्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली असतानाच नांदगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास अवघा एकच दिवस बाकी आहे. राजकीय नेत्यांसमोर उमेदवारांची नावे जाहीर करतांना प्रथमच दमछाक होताना दिसून येत आहे.
नवे मतदार (New Voter) बदललेली भौगोलिक स्थिती आणि वाढता शहरी विस्तार यामुळे राजकीय गणितच बदलले असून, पारंपरिक नेत्यांसमोर नव्या आव्हानांची उभारी आहे. नांदगाव नगरपरिषदेच्या प्रभागांमध्ये विविध पक्षांच्या वतीने चाचपणी करून उमेदवार निवड अंतिम टप्प्यात आली असली तरी अनेक प्रभागांत पक्षांतर्गत नाराजी वाढली आहे. काही ठिकाणी विद्यमान नगरसेवकांचे स्थान बदलण्याची मागणी होत असून, नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा दबाव निर्माण झाला आहे. तसेच नांदगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर आहे.
स्थानिक नेत्यांकडून अद्याप अधिकृत उमेदवारी (Candidacy) जाहीर झालेली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास एक दिवस बाकी आहे. मात्र तरीही उमेदवारांची नावे जाहीर होत नसल्याने मोठ्या प्रमाणात सस्पेन्स वाढला आहे. नगराध्यक्षपद वगळता १० प्रभागामधून २० नगरसेवक निवडले जाणार आहेत. मात्र शिवसेनेकडे नगरसेवक पदासाठी अनेकजण इच्छुक आहेत, तर नगरसेवक पदासाठी एका एका प्रभागातून अनेक जण इच्छुक आहेत. काहींनी आपल्याला उमेदवारी नाही मिळाल्यास महिलांच्या प्रभागात पत्नी, बहिण, चुलती, आई यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत.
नगरसेवकसाठी २० अर्ज
नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. १६) नगराध्यक्षपदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. तर ८ उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी ८ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत नांदगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी फक्त २० उमेदवारांनी अर्ज दाखल झाले आहेत. नांदगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी नगराध्यक्षपदासाठी एकही अर्ज भरला नाही. ८ उमेदवारांना नगरसेविका पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक ४ ब कासलीवाल पवन तिलोकचंद (अपक्ष), प्रभाग क्रमांक ५ अ देहाराय सिंधुबाई हिरामण (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), प्रभाग क्रमांक १ ब पेहेरे कमलेश पोपट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), प्रभाग क्रमांक-८ अ देहाडराय विष्णू रमेश (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), प्रभाग क्रमांक- ७ अ भगत दर्शना सोमनाथ (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), प्रभाग – २ ब शाहिस्ता माजिद सय्यद (अपक्ष), प्रभाग क्रमांक ९ ब सोळसे राणी सुनील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), प्रभाग क्रमांक ३ ब देवकते सचिन अशोक (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. नांदगाव नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची उद्या अंतिम मुदत (दि. १७) नोव्हेंबर आहे.




