नाशिक | Nashik
नाशिक महापालिका निवडणुकीत (Nashik NMC Election) महायुतीमध्ये फुट पडली असून, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अ. प.) व रिपब्लिकन सेना यांची युती झाली आहे. तर भाजप स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये महाविकास आघाडी, भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादी असा तिरंगी सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपने नाशिक महानगरपालिकेत सवता सुभा मांडत एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महायुतीतील शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस यांना अखेरच्या क्षणापर्यंत झुलवत दूर ठेवले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या मुदतीच्या एक दिवस अगोदर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत निवडणूकिला सामोरे जाण्याचा निर्णय घेत तसे जाहीरही केले आहे. त्यामुळे आता शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि उबाठा-मनसे असा तिरंगी सामना रंगणार असे चित्र स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँगेस शरद पवारचे निरीक्षक माजी आमदार सुनील भुसारा यांनी मतविभाजन टाळण्यासाठी नाशिकमध्ये मविआ एकत्रित निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे सांगितले. तसेच बैठकीच्या दोन ते तीन फेऱ्या झाल्या असून अद्याप १० ते १२ जागांचा तिढा कायम आहे. आज संध्याकाळपर्यंत यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी म्हटले.




