नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्यातील एकूणच राजकीय परिस्थिती, यातही वरचढ ठरलेले नाशिकमधील (Nashik) पक्षांतर पाहता नाशिक महानगरपालिकेची निवडणूक ही तिरंगी, चौरंगी होणार या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे चित्र आहे. यामध्ये भाजप शिवसेनेची राजकीय गणिते जुळलीच तर शिवसेनेला बरोबर घेऊन लढेल. ठाकरे बंधू हे काँग्रेसला बरोबर घेऊन लढतील. अजित पवार आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस एकीकरणाचा पुण्यातील फॉर्म्युला नाशिकमध्येही राबवला जाण्याची शक्यता आहे. यातही वेळ आल्यास आणि कार्यकर्त्यांची भूमिका लक्षात घेऊन शिंदे यांची शिवसेनादेखील स्वबळ अजमावण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुरंगी, तिरंगी म्हणता म्हणता ही निवडणूक चौरंगी होते की काय? अशी शक्यता आता वाटू लागली आहे.
सर्वच पक्षांमध्ये विशेषतः सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेमध्ये आयारामांची संख्या दिवसागणीक वाढत चालली आहे. यात तर भाजपने सर्व मर्यादा ओलांडल्याचे चित्र सद्यस्थितीत आहे. निवडून येण्याची क्षमता पाहून भाजपने इतर पक्षातील आयारामांना संधी देण्याची भूमिका घेतली आहे. अशीच काहीशी भूमिका घेत शिवसेनादेखील भाजपच्या पावलावर पाऊल ठेवून चालली आहे. दुसरीकडे उबाठा, मनसे आणि काँग्रेसची मात्र एकूणच राजकीय वाताहात पक्ष सोडून जाणाऱ्यांमुळे होत असल्याचे चित्र आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या (NMC Election) पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये एकूणच होत असलेली उलथापालथ पाहता प्रारंभी महायुती आणि महाविकास आघाडीचा प्रयोग नाशिकमध्ये होईल, याचे चित्र आता तरी धूसर होत चालल्याचे एकूणच परिस्थितीवरून समोर येत आहे. महायुतीमधील भाजपने १०० प्लसचा नारा दिला असून शिवसेनेनेही आता अधिक वाट न पाहता स्वबळाच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याचे चित्र आहे. जर ही महायुती झाली नाही तर भाजप आणि शिवसेना सर्वच जागांवर लढेल, अशी शक्यता आता वाटू लागली आहे.
दुसरीकडे महायुतीतील (Mahayuti) घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीतील भाजप आणि शिवसेनेने चार हात दूरच ठेवल्याचे चित्र आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढण्याच्या हालचाली सुरू आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईनंतर राज्यातील विविध महानगरपालिकांबरोबरच नाशिक महानगरपालिकेतदेखील ठाकरे बंधू एकत्र लढणार असे चित्र आहे. त्यांनी काँग्रेस व इतर पक्षांना बरोबरीला घेण्याचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.
ठाकरेंचे नाशिकमध्ये ठरले?
नाशिकमध्ये एकूण १२२ जागांपैकी उबाठा ६५ ते ७०, मनसे ४५ ते ५० आणि काँग्रेस व इतर पक्षांना १० जागा सोडण्यावर एकमत होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नाशिकमध्ये आता भाजप, शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे बंधूची शिवसेना व काँग्रेस अशी चौरंगी लढत होईल, अशी राजकीय शक्यता वाटत आहे.




