नाशिक | Nashik
महापालिका निवडणुकीसाठी (NMC Election) मंगळवार (दि. २३) पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र, महायुती किंवा महाविकास आघाडीचे (Mahayuti and Mahavikas Aagahdi) जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. यातील महायुतीमध्ये जागावाटपासंदर्भात बोलणी सुरु होती. पंरतु, आता ती थांबल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नाशकात महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला असून, भाजप आणि शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर अजित पवारांची राष्ट्रवादी (NCP Ajit Pawar) कुणासोबत युती करते हे बघणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
शिंदेंच्या शिवसेनेकडून १२२ जागांपैकी भाजपकडे (BJP) ४५ जागांची मागणी करण्यात आली होती. मात्र, भाजपने फक्त ३५ जागा देण्यास तयारी दर्शवल्याचे बोलले जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस ३० जागांवर अडून बसल्याचे समजते. त्यामुळे महायुतीचे जागावाटप फिस्कटल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भाजपकडे १२२ जागांसाठी तब्बल १२०० इच्छुकांचे अर्ज आले आहेत. त्यामुळे भाजपने वरिष्ठ नेत्यांकडे स्वबळावर लढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा : Nashik NMC Election : तिसर्या दिवशी ५९० इच्छुकांनी नेले १,१४८ उमेदवारी अर्ज; कोणत्या विभागात किती?
दुसरीकडे स्थानिक पातळीवर चर्चा थांबल्या असल्या तरी मुंबईत वरिष्ठांमध्ये नाशिकबाबत (Nashik) चर्चा सुरू असल्याचे समजते. यात भाजपला सर्वाधिक ८० जागा, त्याखालोखाल शिवसेनेला ३५, तर राष्ट्रवादी काँग्रेसला सहा आणि रिपब्लिकन पक्षाला १ जागा सोडल्याचा फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जात आहे. यामुळे पुढील दोन दिवसांत नाशिकमध्ये भाजप आणि शिंदेंची सेना स्वबळावर लढणार की युतीत? हे स्पष्ट होईल.
महाविकास आघाडीत १०५ जागांवर सहमती
एकीकडे महायुतीमध्ये जागावाटपाबाबत एकमत होत नसतांना दुसरीकडे महाविकास आघाडी आणि मनसेचे १०५ जागांवर सहमती झाल्याची माहिती समोर आली आहे. केवळ दोन प्रभाग आणि तीन ते चार जागांवर आडल्याचा दावा अनेक पक्षांनी केला आहे. त्यावर आज सायंकाळपर्यंत तोडगा निघण्याची शक्यता आहे. मविआची बैठक ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात पार पडली. त्यात १०५ जागांवर सहमती झाल्याचे समजते. यामुळे आज किंवा उद्या उमेदवारांच्या याद्या घोषित होण्याची शक्यता आहे.





