नाशिक | Nashik
राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी महापौरपदाचे आरक्षण (Mayor Post Reservation) जाहीर झाले आहे. यात नाशिकचे महापौरपद सर्वसाधारण महिला राखीव निघाले आहे. या आरक्षण सोडतीत ५० टक्के महिला आरक्षणाचे नियम लागू केल्याने राज्यातील १५ महापालिकांवर महिला महापौर असणार आहे. तर १४ ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळाली आहे. त्यामुळे महापौरपदाची आस लागलेल्या तब्बल अर्धा डझनहून अधिक पुरुष इच्छुकांची मात्र निराशा झाली आहे. यामुळे आता पुढील अडीच वर्षांची प्रतीक्षा त्यांच्या वाट्याला आली आहे.
हे देखील वाचा : Mayor Reservation : नाशिक, मालेगाव, धुळे महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव; वाचा कोणत्या महापालिकेत कुठले आरक्षण?
भाजपकडे (BJP) बहुमत असल्याने नाशिकमध्ये महापौर कोण होणार? याची चर्चा रंगत असतानाच आरक्षण सोडतीकडे अनेकांनी डोळे खिळवून ठेवले होते. यासाठी अनेक ज्येष्ठ नगरसेवकांनी ‘देव पाण्यात ठेवून’ महापौरपदाची स्वप्ने रंगविली होती. यामध्ये सुरेश अण्णा पाटील, श्याम बडोदे, चंद्रकांत खोडे, मच्छिंद्र सानप, तसेच निवडणुकीआधी भाजपमध्ये दाखल झालेले सुधाकर बडगुजर, दिनकर पाटील व शाहू खैरे यांचा समावेश होता. मात्र, आरक्षण सोडतीत महापौरपद सर्वसाधारण महिला राखीव झाल्याने या सर्वांच्या आकांक्षा धुळीस मिळाल्या आहेत. त्यामुळे आता पुढील टर्ममध्ये कोणत्या प्रवर्गातून महापौरपद खुले होते. याकडे त्यांचे लक्ष राहणार आहे.
हे देखील वाचा : Nashik Mayor Reservation: आरक्षण सोडत जाहीर होताच महापौरपदासाठी ‘ही’ नावे चर्चेत; भाजपकडून कुणाला मिळणार संधी?
भाजपकडून महापौरपदासाठी कुणाचे नाव आघाडीवर?
महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी (Women Category) राखीव झाल्याने भाजप आमदार राहुल आहेर यांच्या भगीनी आणि माजी स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके या महापौरपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. त्यांच्याकडे राजकीय वारसा, प्रशासकीय अनुभव आणि संघटनात्मक ताकद असल्यामुळे त्यांचे नाव पहिल्या नंबरवर आहे. याशिवाय आमदार देवयानी फरांदे यांच्या निकटवर्तीय स्वाती भामरे, मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते यांची पत्नी दिपाली गीते, माजी आमदार अपूर्व हिरे यांच्या पत्नी डॉ. योगिता हिरे यांचीही नावे चर्चेत आहेत. तसेच पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या माजी महापौर विनायक पांडे यांची सून आदिती पांडे, श्वेता भंडारी, चंद्रकला धुमाळ, रोहिणी पिंगळे, जयश्री गायकवाड यांच्यासह सुप्रिया खोडे, माधुरी बोलकर, प्रतिभा पवार यांचेही नावे महापौर पदासाठी शर्यतीमध्ये आहेत. त्यामुळे आता महापौरपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडते, याकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागून आहे.
हे देखील वाचा : Malegaon Mayor Reservation : माजी आमदार शेख महापौर पदासाठी अनुभवी की नवीन चेहऱ्याला संधी देणार?
पक्षांतर्गत हालचालींना वेग
आरक्षण जाहीर होण्याआधीच भाजपमध्ये महापौरपदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी हालचाली वाढवल्या होत्या. विविध पातळ्यांवरून पक्षश्रेष्ठी, वरिष्ठ नेते आणि संघटनात्मक नेतृत्वाकडे मोर्चेबांधणी सुरू केली होती. त्यामुळे आता महापौरपदासाठी उमेदवार ठरवताना पक्षातील ज्येष्ठता, महापालिकेतील अनुभव, पक्षनिष्ठा, संघटनात्मक कामगिरी, वरिष्ठांशी असलेली जवळीक आणि शिफारसी या सर्व बाबींचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : Nashik Election Results 2026 : प्रभाग निहाय पक्षीय विजयी उमेदवारांची यादी; वाचा सविस्तर




