नाशिक | Nashik
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल (बुधवारी) मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली. यामुळे संपूर्ण राज्यात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला होता. यात नाशिकमध्ये देखील मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला होता. काल (बुधवारी) हा आनंदोत्सव साजरा करतांना ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर विनायक पांडे देखील हजर होते. मात्र आता याच पाडेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी महापौर विनायक पांडे (Vinayak Pande) यांच्यासह यतीन वाघ,माजी नगरसेवक संजय चव्हाण आणि काँग्रेसचे गटनेते आणि माजी नगरसेवक शाहू खैरे हे आज (गुरुवारी) भाजपचे संकटमोचक आणि मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत. पांडे हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मानले जात होते. मात्र,अचानक त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
यावेळी माध्यमांशी बोलतांना पांडे म्हणाले की, “पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे माझ्या मुलाच्या उमेदवारी संदर्भात मागणी केली होती. पंरतु, त्यांच्याकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. तरुण पिढीला आता पुढे नाही आणायचे तर मग कधी? माझी पक्षातील कोणावरही नाराजी नाही. माझ्यासोबत आज (गुरुवार) काँग्रेसचे शाहू खैरे, माजी महापौर यतीन वाघ, माजी नगरसेवक संजय चव्हाण प्रवेश करणार” असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, काल (बुधवारी) काँग्रेसचे (Congress) माजी नगरसेवक राहुल दिवे यांच्यासह अशा तडवी, पूजा नवले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अनिल जोंधळे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेसह राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आज (गुरुवारी) ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.




