नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक सिंहस्थ व अध्यात्मिक, सांस्कृतिक, खगोलशास्त्रीय, ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या दृष्टिकोनातून आणि ‘अतुल्य भारत’ संकल्पनेतून नाशिकचा आध्यात्मिक वारसा जागतिक पातळीवर प्रोत्साहित करण्यासाठी प्रयागराज महाकुंभमेळ्याच्या धर्तीवर नाशिक सिंहस्थावर (Nashik Simhastha) टपाल तिकीट प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २०२७ च्या वार्षिक कार्यक्रमात हे तिकीट प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामुळे देशभरात नाशिकची मान गौरवाने उंचावली जाणार आहे.
केवळ पत्रव्यवहारापुरते मर्यादित न राहता टपाल विभागाने (Postal Department) कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे डिजिटल व्यवहार शक्य करून दाखवले आहेत. मोबाईल व इंटरनेटद्वारे ऑनलाइन मनी ट्रान्सफर, विमा, बिल पेमेंट सुविधा दिल्या आहेत. मात्र काही ठिकाणी अजूनही नेटवर्क अडचणी येत असून डिजिटल साक्षरतेची गरज कायम आहे. व्यावसायिक पत्रव्यवहार, सरकारी (Government) कामकाजासाठी टपाल सेवेवाच वापर केला जातो. टपाल सेवेनेही मोबाईलवर टपाल ट्रैक करणे, मेसेज पाठवणे, अशा सेवा जोडल्या आहेत.
आजही पार्सल पाठवण्यासाठीचे विश्वासार्ह साधन म्हणून टपाल खात्याकडेच पहिले जाते. त्याशिवाय टपाल खात्याने, बचत पत्रे आणि इतर काही वित्तीय सेवा सुरू करून कक्षाही संदावल्या आहेत. पेमेंट बँक सुरू करण्याची जबाबदारी टपाल खात्याने स्वीकारली आहे. पोस्टाच्या पेमेंट बँक लोकांच्या घरोघरी जाऊन, आर्थिक सेवा देत आहेत. सरकारच्या, जनधन-आधार मोबाईल या जॅम त्रिसूत्रीच्या यशातही, टपाल खात्याचे योगदान आहे.
दरम्यान, पोस्ट विभागाने देशभरातील पोस्टल सर्कल्सकडून आयकॉनिक टपाल कार्यालयांची निवड करण्यासाठी प्रस्ताव मागविले होते. त्यात फिलॅटेली (टपाल तिकीट संग्राहकत्व) प्रोत्साहनासाठी जास्त वर्दळ असणारी पोस्ट कार्यालये, तसेच फिलॅटली ब्युरोचे मानकीकरण करण्याबाबत सूचना मागविण्यात आल्या होत्या.
लॉजिस्टिक, बँकिंग, ग्राहक सेवा, व्यवस्थापन क्षेत्रात संधी
आधुनिकीकरण प्रकल्प २.० हा भारतीय टपाल विभागाच्या इतिहासातील एक क्रांतिकारक टप्पा आहे. या उपक्रमाद्वारे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना तंत्रज्ञानावर आधारित, जलद आणि विश्वासार्ह टपालसेवा मिळणार आहेत. भारत पोस्टचे हे डिजिटल रूपांतर डिजिटल इंडियाच्या दिशेने मोठे पाऊल ठरणार आहे.
प्रवीण वाणी, प्रवर अधीक्षक, नाशिक




