अकोले । Akole
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादावर राज्याचे महसूल व जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची घोषणा करत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. देवठाण जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
नाशिक-पुणे रेल्वे देवठाण मार्गेच नेण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला शब्द देतो, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले. २०१९ मध्ये या रेल्वेचा मार्ग देवठाणवरून प्रस्तावित होता, मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०२१ मध्ये हा प्रस्ताव कोणी बदलला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. स्वतःची अकार्यक्षमता लपवण्यासाठी विरोधक रेल्वेच्या प्रश्नावरून ‘शिट्या’ वाजवत आहेत, मात्र जनता त्यांचा ‘भोंगा’ वाजवल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. या संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र दिले असून, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय न घेण्याची विनंती केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन २०१९ चा मूळ प्रस्ताव कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाणी प्रश्नावर बोलताना विखे पाटील म्हणाले की, या भागातील जनतेच्या त्यागामुळे जिल्ह्याचे पाण्याचे प्रश्न सुटले आहेत. आता या भागासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देणे हे आमचे कर्तव्य आहे. ‘बिताका’ प्रकल्पाद्वारे २०० ते ३०० एमसीएफटी पाणी आढळा खोऱ्यात वळवण्यासाठी सर्वेक्षणाच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असून, त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. केवळ शेतीच नव्हे, तर पर्यटनाच्या माध्यमातून तालुक्यात रोजगार निर्माण करण्याचे धोरण महायुती सरकारने आखले आहे. टाटा आणि रिलायन्स सारख्या उद्योग समूहांच्या सहकार्याने येथे प्रशिक्षण केंद्रे उभारून युवक आणि महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात देवठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा खोल्यांचे उद्घाटन आणि विद्यार्थ्यांना डिजिटल बोर्डाचे वाटप करण्यात आले. हे आरोग्य केंद्र पंतप्रधान मोदींच्या ‘आयुष्मान भारत’ योजनेची देण असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. माजी आमदार वैभवराव पिचड यांनीही आपल्या भाषणात विद्यमान आमदारांवर टीका केली. स्व. मधुकरराव पिचड यांनी पाठपुरावा करून रेल्वे देवठाणला आणली होती, मात्र सध्याच्या लोकप्रतिनिधींना ती गेल्याचे समजले देखील नाही, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमास आमदार अमोल खताळ, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, माजी आमदार वैभवराव पिचड, जेष्ठ नेते सीताराम भांगरे, शिवाजीराव धुमाळे, सरपंच विजया सहाणे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.




