नाशिक | Nashik
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये (Nashik) मुसळधार पाऊस (Rain) सुरु आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या (Godavari River) पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. या पावसामुळे गोदामाई खळाळली असून, नाशिककरांची मुसळधार पावसात गोदाघाटावर (Godaghat) पूर बघण्यासाठी झुंबड बघायला मिळत आहे. तर गोदावरीच्या पुराचे मापक मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचले आहे.
नाशिकमध्ये काल (शनिवार) सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु होता. त्यामुळे गंगापूर धरणातून (Gangapur Dam) ३७१६ क्युसेसने पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर रात्री ९४० क्युसेसने वाढ करून एकूण ४६५६ करण्यात आले होते. यानंतर आज (रविवार) सकाळी १० वाजता गंगापूर धरणातून ४६५६ मध्ये ५३० क्युसेसने वाढ करून ५१८६ क्युसेस इतके करण्यात आले आहे. यामुळे गोदावरी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, सध्या रामकुंड (Rakund) परिसर पूर्णतः पाण्याखाली गेला असून, होळकर पुलाखालून ८ हजार क्युसेस वेगाने गोदावरी नदीत पाणी वाहत आहे. तर गोदाघाटावरील दुतोंड्या मारुतीच्या (Dutondya Maruti) कमरेपर्यंत पाणी पोहचल्याने येथील पातळेश्वर मंदिर हे अर्धे पाण्याखाली गेले आहे. तसेच भाजी पटांगणात देखील पुराचे पाणी घुसले आहे.
गंगापूर धरण ५९ टक्के भरले
गंगापूर धरण ५९.४८ टक्के भरले असून धरणातून आतापर्यंत ३० हजार ८५३ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. १ जूनपासून ३ जुलै या कालावधीत जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये १२२.२ मिमी पाऊस पडला आहे. तर दिंडोरीत २०५.१ मिमी पाऊस झाला आहे. तसेच पावसाचा तालुका अशी ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) ७६९.३ मिमी पाऊस नोंदविला गेला आहे.
दारणा धरणातूनही विसर्ग सुरु
आज (रविवार) सकाळी ९ वाजता दारणा धरणातून ६६६ क्युसेसने वाढ करून एकूण ८५८० इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तर दारणा धरणातून ४७६८७ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.




