त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar
नाशिक शहरासह (Nashik City) जिल्ह्यातील ग्रामीण भागात काल रात्रीपासून जोरदार परतीचा पाऊस (Rain) बरसत आहे. त्यामुळे रस्त्यांवर जागोजागी पाणी साचले आहे. तर ग्रामीण भागात कुठे घरे तर कुठे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. यात त्र्यंबकेश्वर शहरासह (Trimbakeshwar City) तालुक्यात रात्रीपासून धो-धो पाऊस कोसळत आहे.
त्र्यंबकेश्वर येथे काल (शनिवारी) सायंकाळी सात वाजेपासून पावसाची संततधार सुरु झाली होती. यानंतर रात्री नऊ वाजता पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. त्यामुळे त्र्यंबक शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी साचल्याचे बघायला मिळाले. कुशावर्त कुंड परिसर, कदम चौक ते भगवती चौक परिसर, संगमेश्वर महादेव मंदिर, सत्यनारायण मंदिर चौक यासह विविध भागांत गुडघ्या एवढे पाणी साचले होते.
यानंतर आज सकाळी सहा ते आठच्या दरम्यान जोरदार पाऊस झाल्याने गल्लोगल्ली पाणी होते. त्यामुळे लोकांच्या दुकानांत आणि घरांत पाणी शिरले. यामुळे त्र्यंबक शहरात पूर सदृश्य परिस्थिती बघायला मिळाली. दरम्यान, त्र्यंबक ते प्रयागतीर्थ रोड देखील पाण्याखाली होता. तसेच स्वामी समर्थ रिंग रोडवर देखील पाणी होते. यामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या पावसामुळे त्र्यंबकेश्वर नगरीत धार्मिक विधीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली.
भात शेतीला फटका
काल रात्रीपासून त्र्यंबकेश्वर शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत असल्याने भात शेतीला मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे तालुक्यातील अंबोली,तळवाडे, पिंपळद, वेळूंजे, शिरसगाव, यासह आजूबाजूच्या गावांची भात शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसला बसला आहे.
तालुक्यातील मंडळ निहाय पाऊस
त्र्यंबकेश्वर तालुक्यात काल (शनिवारी) मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. यात त्र्यंबकेश्वर ८१, मिली मीटर, वेळूंजे १४५ मिली मीटर आणि हरसूलमध्ये १६१.२० मिली मीटर पावसाची नोदन झाली आहे.
ब्राम्हणवाडेचा संपर्क तुटला
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद येथील पूल पाण्याखाली गेल्याने ब्राम्हणवाडे गावाचा संपर्क तुटला आहे. तसेच पिंपळदमधील साबरवाडीतील लोकांचा देखील गावाशी संपर्क तुटला आहे.





