नाशिक | Nashik
गेल्या दोन दिवसापासून नाशिक शहरासह जिल्ह्यात (Nashik City and District) पावसाने (Rain) धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात देखील मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची भात, टोमॅटो, झेंडूची बागसह विविध पिके जमीनदोस्त झाली आहेत.
या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील बारशिंगवे गावातील (Barshingway Village) एका शेतकऱ्याने व्हिडिओच्या माध्यमातून सरकारकडे कर्जमाफीची मागणी करत तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधांवर येण्याची विनंती केली आहे. तसेच या त्यांनी सरकारला शेतकऱ्यांचा अंत पाहू नका असे म्हणत हीच कर्जमाफीची योग्य वेळ असल्याचे म्हटले आहे.
शंकर चोथे असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी त्यांच्या शेतात १ एकरमध्ये टोमॅटोची (Tomato) तर एक एकरात झेंडूच्या फुलांची लागवड केली आहे. मात्र काल रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे ही दोन्ही पिके जमीनदोस्त झाली आहेत. टोमॅटोच्या प्लॉटमध्ये गुडघाभर पाणी असून, त्यांची पत्नी आणि मुले हे पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु हे पाणी बाहेर निघत नाही.
चोथे यांना टोमॅटो लागवडीसाठी जवळपास दीड लाख रुपये खर्च आला असून, ते या पावसामुळे (Rain) हवालदिल झाले आहेत.बारशिंगवे महामंडळात कालपासून आज सकाळपर्यंत १०३ मिलीमीटर पाऊस झाला असून, अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यावर नैसर्गिक संकट कोसळल्याने याकडे लोकप्रतिनिधींसह सरकारने लक्ष देऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून द्यावी, अशी मागणीही त्यांनी व्हिडीओद्वारे केली आहे.
दरम्यान, नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्याचा कुणीतरी वाली असला पाहिजे. राजकारण्यांनी निष्ठुरतेने वागू नये. प्रत्येक शेतकऱ्याचे काढणीला आलेले पिक जमीनदोस्त झाले आहे. सरकारने निवडणुकीची वेळ पाहून कजर्माफी करू नये. आता कर्जमाफी केली नाही तर शेतकऱ्याकडे आत्महत्येशिवाय कुठलाही पर्याय उरणार नाही. त्यामुळे मायबाप सरकारने यावर लवकर तोडगा काढून निर्णय घ्यावा, असे या शेतकऱ्याने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.




