सुरगाणा | प्रतिनिधी | Surgana
तालुक्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने (Heavy Rain) हाहाकार माजवला असून, यामुळे तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. नद्यांना (River) आणि नाल्यांना आलेल्या पूरस्थितीमुळे शेती, वाहतूक व्यवस्था आणि दैनंदिन जीवन यावर मोठा परिणाम झाला आहे.
या पावसामुळे पेरलेली बियाणे वाहून गेली आहेत. तसेच रोपे उगवली नसून, अनेक शेतकऱ्यांनी (Farmers) वेळेत पेरलेली वरई, नागली व भात यांसारख्या पिकांची पेरणी वाया गेली आहे. पेरलेले बियाणे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहे. तर काही ठिकाणी पेरणी केल्यानंतर रोपे उगवण्याआधीच पावसाने जमिनीतून मातीसह बियाणे उचलून नेले.
तसेच काही भागात सततच्या पावसामुळे (Rain) पेरलेली रोपे उगवलीच नाहीत, त्यामुळे शेतकर्यांना पुन्हा एकदा बियाणे (Seed) खरेदी करून नव्याने पेरणी करावी लागणार आहे.
मशागत पूर्ण न होता कामे ठप्प
या सततच्या पावसामुळे शेतजमिनी पूर्णपणे चिखलमय झाल्या आहेत. अनेकांनी मशागत सुरू केली होती मात्र मध्यंतरातच पावसाने खंड न पाडल्याने कामे अर्धवट राहिली आहेत. विशेषतः डोंगर उतारावरील शेतजमिनीतील माती आणि बांध पावसामुळे वाहून गेले असून, या जमिनी पुन्हा शेतीयोग्य करणे हे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
रस्त्यांची दुर्दशा, दळणवळणात अडथळे
तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. गावोगावचे रस्ते पाण्याने झाकले गेले असून, काही ठिकाणी चिखल आणि गटारी भरल्यामुळे नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. काही रस्ते पूर्णत: खराब झाल्याने शाळकरी मुले, रूग्ण आणि वृद्ध यांना दवाखान्यात किंवा कामावर जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे.
मी दोन वेळा भात पेरले, पण दोन्ही वेळा बियाणे पावसात वाहून गेले. आता हातात पैसे नाहीत, पुन्हा बियाणे आणायचे कसे?
उत्तम धूम, शेतकरी, वांगणसुळे
मुलांना शाळेत पाठवायचे म्हणजे जीव धोक्यात घालावा लागतो. रस्ता चिखलात गच्च झालाय, बूट सुद्धा चिखलात अडकतात.
दुर्गा गवळी, महिला पालक
मी ६५ वर्षांचा आहे, पण मे महिन्यापासून सलग दुसरा महिना झाला असून, असा पाऊस सतत पडताना फार कमी वेळा बघितला आहे. नद्या-नाले ओसंडून वाहात असून, हे लक्षात घेऊन सरकारने तातडीने मदत द्यायला हवी.
किसन चौधरी, नागरिक




