नाशिक | Nashik
परतीच्या पाऊसाला (Rain) रविवार (दि.१४) पासून राजस्थानातून (Rajasthan) सुरुवात झाली आहे. मात्र, अद्याप महाराष्ट्रातील (Maharashtra) विविध जिल्ह्यांत पाऊस कोसळत आहे. मराठवाड्यातील जालना, बीड या जिल्ह्यांत पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या तरी राज्यात पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाल्याचे म्हणता येणार नाही.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) त्र्यंबकेश्वर, येवल्यासह विविध भागांत पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरीकांची चांगलीच दाणादाण उडाली आहे.आज दुपारच्या सुमारास नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागांत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली.
शहरातील सातपूर, सिडको, उपनगर, शरणपूर रोड, सारडा सर्कल, शालिमार, मेनरोड या भागांत सुमारे अर्धातास पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणीच पाणी साचल्याचे बघायला मिळाले. याशिवाय विजांचा कडकडाट देखील मोठ्या प्रमाणवर ऐकू येत होता. तर नागरिकांनी पावसापासून लपण्यासाठी दुकानांच्या गाळ्यांचा आडोसा घेतल्याचे दिसून आले.
काल (बुधवारी) सायंकाळच्या सुमारास नाशिक शहरात पावसाने हजेरी लावल्यामुळे वाघाडी नाल्यातून अचानक पाण्याचा प्रवाह वाढला होता. त्यामुळे बुधवारच्या बाजारात अचानक पाणी शिरल्याने शेतकऱ्यांची आणि दुकानदारांची तारांबळ उडाली होती. यानंतर आज (गुरुवारी) देखील पावसाने साडे चार वाजेच्या सुमारास हजेरी लावल्याचे बघायला मिळाले.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात दि.१७ ते २१ सप्टेंबर २०२५ या कालावधीत तुरळक हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दि.१७ ते २१ सप्टेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला असून,
घाट क्षेत्रातील एक-दोन ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट पाऊस होण्याचा अंदाज आहे.




