त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar
त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) नगरीत (काल) सोमवारी सायंकाळी झालेल्या एक तासाच्या तुफान पावसाने (Rain) नागरिकांची चांगलीच दाणादाण उडवून दिली. या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर घाण आणि चिखल वाहून आल्याने मेन रोड दुतर्फा, भगवती चौक ,मेनरोड ,लक्ष्मीनारायण चौकात गाळाचे आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. या अवकाळी पावसामुळे डोंगरावरील माती कचरा देखील मोठ्या प्रमाणावर वाहून आला.
तसेच पावसाचे पाणी (Rain Water) शहरातील घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरले होते. त्यामुळे व्यवसायिकांचे आणि रहिवाशांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे साचलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे आज सकाळी नागरिकांना रस्त्याने चालणे देखील मुश्किल झाले होते. यानंतर नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी रस्त्यांची साफसफाई केली. काल रात्री झालेल्या पावसामुळे त्र्यंबक शहरातील रस्त्यांवर (Road) पाणी आले होते. परंतु, मेनरोड गंगा स्लॅब खाली पाणी नव्हते, असे चित्र होते.
यावेळी मेनरोडच्या (Menroad) स्लॅबवरील रस्त्यावरून पाणी वाहताना दिसून आले. त्यामुळे आताच ही स्थिती आहे तर कुंभमेळ्यात काय होईल अशी चर्चा नागरिकांनी सुरू केली आहे. या पावसामुळे डोंगरांवरून मोठ्या प्रमाणावर माती वाहून आली होती. त्यामळे मातीची धूप होत असल्याचे दिसून आले. दरवर्षी मे महिन्यात नगरपरिषदेकडून मेनरोड परिसरातील गंगा स्लॅब खाली नाले सफाई होत असते. मात्र, यावर्षी अजून देखील साफसफाई झालेले नव्हती. त्यामुळे एक ते दीड तास रस्त्यावर पाणी साचून होते. तसेच पाण्याचा निचरा लवकर होत नसल्याने नागरिकांच्या संतापात अधिकच भर पडली होती.
दरम्यान, त्र्यंबकेश्वरमधील घाणीचे दृश्य अनेकांनी सोशल मीडियातून (Social Media) व्हायरल करून शासनाचे आणि नगरपरिषदेचे लक्ष वेधलेले आहे. तसेच शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या (Hospital) आवारात देखील मोठे पाणी साचले होते. यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमध्ये पाणी जाऊन वाहने देखील बंद पडली होती.




