नाशिक | Nashik
राज्यातील अनेक शहरांमध्ये उन्हाचा तडाखा बसत असून, अवकाळीचे ढगही घोंघावत आहेत. आज (सोमवारी) जिल्ह्यातील मनमाड आणि पानेवाडी (Manmad and Panewadi Area) परिसरात दुपारच्या सुमारास गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाला. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.
अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे (Farmer) मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात काढून ठेवलेला कांदा (Onion) भिजला आहे. तर काही शेतकऱ्यांच्या आंबा बागांमधील फळांचे नुकसान झाले आहे. अवकाळीच्या या तडाख्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र चांगलीच वाढली आहे.
दरम्यान, आजच्या अवकाळी पावसामुळे मनमाड भागातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने (Administration) तात्काळ नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी वर्गाने केली आहे.
राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज
हवामान विभागाने (IMD) पुढील पाच दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा या भागांत हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये देखील अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.