नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरासह जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे (Rain) गंगापूर धरण (Gangapur Dam) भरून वाहू लागले आहे. परिणामी सोमवारी (दि. २३ जून) दुपारी २ वाजता गंगापूर धरणातून ६१६० क्यूसेक वेगाने पाणी (Water) विसर्ग करण्यात आला. यामुळे गोदावरी नदीला (Godavari River) या हंगामातील दुसरा पूर आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात जोरदार पावसामुळे जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. शुक्रवार (दि.२०) पासून गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने पाणी सोडले जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहर परिसरात (City) पावसाने दडी मारली असली तरी धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने धरण साठ्यामध्ये पाण्याची वाढ होत आहे. परिणामी प्रशासनाला विसर्ग करणे बंधनकारक झाले आहे.
तसेच शुक्रवारी ११६० क्यूसेक, शनिवारी २३२० क्यूसेक, रविवारी ३९४४ क्यूसेक आणि आज सोमवारी ६१६० क्यूसेकने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. या वाढत्या विसर्गामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून, नदी लगतच्या गावांमध्ये (Village) पूर स्थितीचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, नदीकाठावरील नागरिकांनी आवश्यक ती सावधगिरी बाळगावी, नदीच्या प्रवाहात जाणे टाळावे, अशी सूचना देखील करण्यात आली आहे. विशेषतः पशुपालकांनी आपले जनावरे, शेतीची अवजारे व मोटारपंप सुरक्षित स्थळी हलवावेत, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले आहे. तर धरणांमधील पाणीसाठा (Dam Water Storage) वाढतच असल्याने पुढील काही दिवसांत विसर्गाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.




