Friday, September 25, 2026
HomeनाशिकTrimbakeshwar Rain Update : त्र्यंबकेश्वरमध्ये पहाटे मुसळधार; मुख्य रस्त्यांवरून वाहिले पाणी, शहरात...

Trimbakeshwar Rain Update : त्र्यंबकेश्वरमध्ये पहाटे मुसळधार; मुख्य रस्त्यांवरून वाहिले पाणी, शहरात चिखलाचे साम्राज्य

त्र्यंबकेश्वर | Trimbkeshwar

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेनंतर, आज (बुधवारी) मध्यरात्रीनंतर त्र्यंबकेश्वर नगरीत (Trimbakeshwar City) पावसाने रौद्ररूप धारण केले. पहाटेच्या सुमारास झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे त्र्यंबकेश्वरमधील मुख्य रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही नगरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, काही सखल भागांत तब्बल पाऊण तास पाणी साचून राहिले होते.

- Advertisement -

मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढला

त्र्यंबकेश्वरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस (Rain) सुरू होता. काल (मंगळवारी) सायंकाळी पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे चित्र होते; मात्र मध्यरात्रीनंतर हवामानात अचानक बदल झाला आणि पावसाने पुन्हा जोर धरला. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती.

मुख्य चौकात साचले पाणी

या जोरदार पावसामुळे त्र्यंबकेश्वर शहरातील भगवती चौक, बोहर पट्टी, मेन रोड, लक्ष्मी नारायण चौक आणि गंगाकाठ स्लॅब या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. अनेक ठिकाणी दरवर्षीप्रमाणे पूरसदृश पाणी रस्त्यांवरून वाहत होते. साधारण पाऊण तास हे पाणी या भागात थांबून होते, त्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पहाटे चार वाजेच्या सुमारास पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पाण्याचा निचरा झाला आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

कुंभमेळा कामांच्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य

पावसामुळे डोंगरावरून मोठ्या प्रमाणावर माती वाहून खाली आली आहे. सध्या शहरात सुरू असलेल्या कुंभमेळा कामांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे संपूर्ण परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या चिखलामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नद्यांना आला पूर

पहाटे झालेल्या या धुवांधार पावसामुळे पुष्करणी नदी, गंगासागरकडून येणारे पाणी, म्हातारा ओहळ, निलगंगा, गोदावरी आणि अहिल्या नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली. अहिल्या आणि गोदावरी नदीच्या संगम घाटावर पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगाने वाहत होता.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

त्र्यंबकेश्वर आणि परिसरात पावसाचा जोर कायम असल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच कुंभमेळा कामांच्या ठिकाणी चिखल व खड्डे असल्याने प्रवास करताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

किकवी नदीचा पुल पाण्याखाली

मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद येथील किकवी नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने साबरवाडी, ब्राम्हणवाडे, माळेगाव, दिव्याचा पाडा या गावांचा संपर्क तुटला आहे. पूलावर पाणी असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. तसेच मुसळधार पावसामुळे भात लागवडीसाठी आलेल्या रोपांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यावर पुन्हा रोपे टाकण्याची नामुष्की ओढावली आहे.

हिरडीच्या पुलावरही पाणी

तालुक्यातील हिरडी येथील पुलावर कंबरा इतके पाणी असल्याने वाहतूक खोळंबली आहे. तसेच भात शेतीत पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणवर रोपे सडण्याची शक्यता आहे. तसेच रोहिले,गिरणारेकडे जाणारी वाहतूक देखील बंद झाली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे गणित गुंतागुंतीचे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील 21 जागांसाठी निवडणूक होणार असल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय गणिते पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. दरम्यान,...